आमदार सावरकरांच्या घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाई...

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना महाराष्ट्र सरकारमुळे (Maharashtra Government) देशभर पसरल्याचे लोकसभेतील भाषणादरम्यान सांगितले होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राचा अवमान आहे.
Congress against BJP at Akola
Congress against BJP at AkolaSarkarnama
Published on
Updated on

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी अकोल्यात पुन्हा एकदा आमने-सामने आले. काँग्रेसने आज भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून काँग्रेसच्या आंदोलनाला आक्रमक प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवला असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आमदारांच्या घरापर्यंत पोहोचता आले नाही. पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर भाजपनेही आंदोलन मागे घेतले.

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना (Corona) महाराष्ट्र सरकारमुळे (Maharashtra Government) देशभर पसरल्याचे लोकसभेतील भाषणादरम्यान सांगितले होते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्राचा अवमान असून, त्यासाठी पंतप्रधान मोदी व भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, यासाठी काँग्रेसने (Congress) राज्यभर भाजपच्या नेत्यांच्या घरापुढे आंदोलन सुरू केले आहे. आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या राऊतवाडी स्थित घरापुढे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

दुपारी १२ वाजताच्या सुमारास काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी जठारपेठ चौकाकडून आमदार रणधीर सावरकर यांच्या घराकडे येत असताना त्यांना मध्येच पोलिसांनी थांबविले. काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी तेथूनच घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी कार्याध्यक्ष राजेश भारती, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, विजय देशमुख, मनपाचे विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन, प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, प्रशांत गावंडे, कपिल रावदेव, निखिलेश दिवेकर आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या घरापुढे भाजपचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी एकत्र आले होते. काँग्रेसची घोषणाबाजी सुरू होतात पदाधिकारी व कार्यकर्ते त्या दिशेने घोषणाबाजी करीत सरसावले होते. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. सिव्हिल लाइन्स, रामदासपेठ, पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक, आरपीटीएस दलाचे जवान आदींचा यावेळी बंदोबस्त होता. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केल्यामुळे आमदार सावरकर यांच्या घरापुढेच भाजप कार्यकर्त्‍यांना काँग्रेस विरोधी घोषणाबाजी करून प्रत्युत्तर दिले.

Congress against BJP at Akola
…म्हणून संतापले आमदार सावरकर, अन् अधिकाऱ्यांना झापले !

पोलिसांची काँग्रेसवरच कारवाई, भाजपला सोडले..

आमदार रणधीर सावरकर यांच्या घरापुढे आंदोलन करण्यासाठी आलेल्या काँग्रेसचे २५ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अर्ध्या तासात प्रतिबंधात्मक कारवाई करीत सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आधी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कारवाई करा, असा आग्रह धरला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या म्हणण्याला न जुमानता काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना गाडीत बसवून घेऊन गेले. त्यानंतर भाजपने आंदोलन मागे घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता जाऊ दिले.

सर्व रस्ते केले होते बंद..

काँग्रेसचे आंदोलन लक्षात घेता पोलिसांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेट टाकून बंद केले होते. रणपिसे नगरकडून येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते. रामनगरकडून येणारा रस्ताही बंद करण्यात आला होता. जठारपेठकडून येणारा रस्त्यावरही बॅरीकेटस् लावण्यात आले होते. मोरेश्वर कॉलनीकडून येणाऱ्या रस्त्यावरही पोलिस बंदोबस्त होता. काँग्रेसच्या २५ कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी १०० पोलिस, तीन पोलिसांच्या मोठ्या गाड्या, तीन पोलिस स्टेशनचे ठाणेदार, विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक, शीघ्र कृती दलाचे जवान आदींचा बंदोबस्त होता.

महाराष्ट्राचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागवी, यासाठी काँग्रेसने पोलिसांकडे परवानगी मागून शांततामय मार्गाने आंदोलन केले. काँग्रेस महाराष्ट्राचा अवमान कधीही सहन करणार नाही. जोपर्यंत भाजप नेते महाराष्ट्राची माफी मागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.

- अशोक अमानकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

काँग्रेसकडून राज्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वास्तववादी वक्तव्याचा आधार घेत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा कोणताही अवमान केला नाही. राज्य सरकार त्यांचे अपयश लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनाला भाजप सामोरे जाण्यास सक्षम आहे.

- आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com