Action Intensified : चंद्रपूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्तीचे वरदान लाभलेय. त्यामुळं माफियांचा डोळा या संपत्तीवर असतो. मिळेल त्या वेळात ते प्रशासनाची नजर चुकवत खनिज संपत्तीची चोरी करतात. त्यामुळं प्रशासनाचा महसूल बुडतो व निसर्गाचाही ऱ्हास होतो. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशाासन यंत्रणा सतर्क झाली. अधिकाऱ्यांनी आता गौणखनिजाची तस्करी करणाऱ्या माफियांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई सुरू केलीय. या कारवाईचा अनेक माफियांनी धसका घेतलाय.
गोंडपिपरी या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी खनिज संपत्तीच्या तस्करीबाबत अधिक कडक धोरण स्वीकारलय. या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठे आहेत. त्यामुळं प्रशासकीय अधिकारी गोंडपिपरी तालुक्यात अधिक सतर्क झालेले दिसताहेत. (Action Intensified Mineral Smuggler's in Chandrapur District by Local Administration)
गोंडपिपरीचे उपविभागीय महसूल अधिकारी बालाजी शेवाळे यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनं माफियांवर धडक कारवाई सुरू केलीय. त्यामुळं आता अवैध गौणखनिज उत्खनन किंवा वाहतूक करताना तस्कर सापडल्यास त्यांना थेट जेलची हवा खावी लागणार आहे. याशिवाय त्यांना दंडही भरावा लागणार आहे.
कारवाईची सुरुवात गोंडपिपरी उपविभागातील वाहनांच्या तपासणीपासून करण्यात आली. गोंडपिपरी व पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये महसूल विभागाच्या पथकांनी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरू केली. वर्धा, वैनगंगा व अंधारी या तीन मोठ्या नद्यांच्या पात्रातून वाळूची तस्करी केली जाते. याशिवाय इतर गौणखनिजाचीही तस्करी केली जाते. त्यामुळं या तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांनी सर्वांत जास्त गस्त सुरू केलीय.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव बंद आहेत. त्यामुळं प्रशासनानं ऑनलाइन परवानगीनं रेतीचा पुरवठा करणं सुरू केलंय. अशात अनेक जणांनी अवैध वाळूउपसा, गौणखनिजाची चोरी चालवलीय. त्याचा फटका शासनाच्या तिजोरीला व नैसर्गिक साधनसंपत्तीलाही बसतोय. यासंदर्भात उपविभागाचा आढावा घेतल्यानंतर बालाजी शेवाळे यांनी कारवाईचे आदेश सहकारी अधिकाऱ्यांना दिलेत.
आदेश प्राप्त होताच दोन तालुक्यांमधील वाळू घाट, गौणखनिज संपत्ती असलेल्या ठिकाणांची व वाहनांची तपासणी सुरू करण्यात आलीय. गावागावांत जात अधिकाऱ्यांनी आता यापूर्वी किती जणांविरुद्ध गौणखनिज संपत्ती तस्करीचे गुन्हे दाखल आहेत, याचा शोध घेण्यास सुरुवात केलीय. प्रसंगी यासाठी पोलिस विभागाचीही मदत घेण्यात येतेय. महसूल पथकांची नजर चुकविण्यासाठी तस्करांनी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास वाहतूक करणं सुरू केलं होतं. परंतु आता पथकांनी २४ तास वाटून घेतल्यानं गस्तीचं प्रमाण वाढलंय. परिणामी केव्हा वाहतूक करावी, असा प्रश्न तस्करांना पडलाय. त्यामुळं जिल्ह्यातील तस्करांनी सध्या गोंडपिपरीच्या वाट्याला न जाण्याचं ठरवलंय.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.