यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार व एक आमदार आहेत. त्यात हिंगोली-उमरखेड लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, (MP Hemant Patil) यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) आणि दिग्रस-दारव्हा-नेरचे आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांचा समावेश आहे. खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, आमदार संजय राठोड बंडात सहभागी असून खासदार भावना गवळी यादेखील त्याच मार्गावर जाताना दिसत आहेत.
मूळ शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असे शिंदे गटाचे नेते सांगत आहेत. त्यामुळे या १२ मध्ये खासदार गवळीसुद्धा असाव्या, असा कयास लावला जात आहे. असे झाले तर यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेत नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होणार असून शिवसेनेला नव्या नेतृत्वाचा शोध घ्यावा लागणार आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार गवळी यांनी बंडखोर आमदारांचे समर्थन करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचे समर्थन केल्यानेच शिवसेनेने ही कारवाई केल्याची चर्चा सर्वत्र आहे.
विदर्भातील शिवसेनेची वाघीण अशी खासदार भावना गवळी यांची पक्षात ओळख आहे. गेल्या पाच पंचवार्षिकपासून त्या लोकसभा सदस्य म्हणून लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा सन्मान म्हणूनच पक्षाने त्यांना लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी नेमले होते. मात्र, त्यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागल्यापासून ते सार्वजनिक कार्यक्रमात कधी सहभागी झाल्या नाहीत. शासकीय बैठकांनादेखील उपस्थित नाही. मतदारसंघातील जनतेशी त्यांचा संपर्क नाही. परंतु, राज्यात शिवसेना नेते व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना सोबत घेऊन बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या बंडामुळे शिवसेना सावध झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाची नव्याने बांधणी सुरू केली आहे. ते स्वत: जिल्हा प्रमुख व विभागप्रमुखांशी संपर्क ठेवून आहेत. राज्यातील शिवसेना आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे काही खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेच्या आमदारांचे समर्थन करण्यासाठी खासदार भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बंडात सहभागी आमदारांची भावना समजून घ्या, निर्णय कठीण असला तरी कठोर निर्णय घेऊ नका, बंडखोरांवर कारवाई करू नका, हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपशी जुळवून घ्या, अशी विनंती केली होती. तसेच पत्रात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते.
खासदार गवळींच्या या पत्राचा अर्थ राजकीयदृष्ट्य़ा त्यांनाही भाजप जवळची असल्याचा काढला गेला. किंबहुना खासदार गवळी शिवसेना सोडून भाजपमध्ये जातील अशीही चर्चा रंगू लागली. या पार्श्वभूमीवर खासदार गवळी यांना लोकसभेतील मुख्य प्रतोद या पदावरून हटविण्यात आले असून त्यांच्या जागी ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तूर्तास, या बदलामुळे यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यादेखील खासदारांच्या बंडात सहभागी होतील का, या चर्चेला उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.