मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची गाडी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात सुसाट सुटली आहे. पहिल्या दिवशी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची राजीनामा मागत विधानसभा डोक्यावर घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. कमी महत्वाची खात्यावरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना चिमटे घेत त्यांच्या जखमेवर मीठ चाेळले. (Ajit Pawar pinched Chandrakant Patil for a less important account)
विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांतदादा कधी कधी मला तुमची प्रचंड आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती जर मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्रीपदी असती तर आतासारखी टोलवाटोलवी झाली नसती. मला माहिती आहे, आमचा कोल्हापूरचा ढाण्या वाघ...पण त्यांना एक-दोन साधी खाती देऊन बाजूला केलं आहे आणि स्वतः (फडणवीस यांना उद्देशून) सहा-सहा महत्वाची खाती घेतली आहेत. या पद्धतीचं राजकारण करता, हे काय बरोबर नाही. तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल या लोकांचा.
तत्पूर्वी बोलताना पवार यांनी सांगितले की, आपल्या सभागृहात आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि १८ मंत्री आहेत. या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही नामुष्की आहे. याचं आत्मचिंतन करा. आज रात्री दिल्लीला फोन लावा आणि कुणाचं नावं घ्यायचं आहे ते घ्या आणि उद्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा. कारण वीस लोकांनी किती काम केलं तर ते पुरेसे ठरत नाहीत.
सुरुवातीला तर तुम्ही दोघांनीच सरकार चालवलं. त्यानंतर १८ मंत्री घेतले. पण अजून तुम्हाला २२ ते २३ आमदारांना मंत्री करता येतं. कोणला घ्यायचं त्यांना घ्या, पण, त्यांना संधी द्या. त्यामुळे कामाचा उरक होऊ शकतो. अनेकदा तुमचे (भाजप) मंत्री सांगतात की, आमच्या वरिष्ठांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना विचारावं लागेल. शिंदे गटाचा सवतासुभा असल्यामुळे ते निर्णय घेत असतात. पण, राज्यात अशी पद्धत नव्हती. त्यामुळे कारभारात अडचण येते. जनतेच्या कामासाठी प्रत्येक वेळी तुमच्याकडे जावे लागणे, हे काय बरोबर नाही.
तुमच्या दोघांचं (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) फार बेस चाललं आहे. देवेंद्र फडणवीस यांना काय विचारले की, ते म्हणतात मुख्यमंत्र्यांची संमती आणा. त्या महाराजांना (मुख्यमंत्र्यांना) काय विचारलं की ते म्हणतात, देवेंद्र यांनी म्हटलं की मी केलं. झालं या दोघांची इकडून तिकडं आणि तिकडून इकडं एवढीच टोलवाटोलवी सुरू आहे, या शब्दांत राज्याच्या कारभारावर पवारांनी आसूड ओढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.