

Akola Municipal Election : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपतो आहे. या प्रचारात सर्वाधिक लक्ष्य झाली ते सत्ताधारी भाजप! राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेली भाजप विरोधकांच्या रडारवर राहिली. नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा आरोप भाजपवर सातत्याने होत आहे.
आता तसाच आरोप महापालिका निवडणुकीत होऊ लागला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांनी, 'भाजपने मटका जुगार चालवणाऱ्या गुन्हेगाराला उमेदवारी दिले आहेत. हे आरोप खोटे निघाल्यास आमदारकीचा राजीनामा देईल,' असे प्रति आव्हान देखील दिल्यानं खळबळ उडाली आहे.
अकोला महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. विरोधकांनी राज्यातील भाजप सत्ताधाऱ्यांना चांगलेच लक्ष्य केलं. आमदार नितीन देशमुख यांनी, अकोला महापालिका निवडणुकीत भाजपने (BJP) गुन्हेगार आणि हत्यारांसह वरली मटका जुगार चालवणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा दावा केला.
आपण केलेले आरोप खोटं असेल, तर भाजपने समोर येऊन सिद्ध करावं, खोटं ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देऊ, असं भर प्रचार सभेत आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी भाजपला प्रतिआव्हान दिलं. भाजप गोरगरिबांचे घर उद्ध्वस्त करून मटका जुगार चालवणाऱ्यांची घरं भरणारे लोक निवडणुकीच्या मैदानात उतरवली आहेत, त्यांना धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन नितीन देशमुख यांनी या वेळी केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची देखील अकोला इथं सभा झाली. त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर शेलक्या शब्दांत हल्ला चढवला. काँग्रेस हा पक्ष छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा 'भुरटा चोर' असल्याचं म्हटलंय. तर भाजपवाले हे मात्र 'डाकू' आहेत, असा घणाघात केला. भाजपवाले अख्खं दुकानच लुटून नेतात. त्यामुळे डाकूंच्या सत्तेला पूर्णविराम द्यावाच लागेल, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
महाराष्ट्रात सरकारकडूनच गुंडगिरी चालू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोल्यात मतदारांचे प्रभाग जाणिवपूर्वक बदलण्यात आले. 'AIMIM'ची भाजपसोबतची युती मुस्लिमांना रुचलेली नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
'प्रहार'चे नेते बच्चू कडू़ यांनी देखील अकोले इथं सभा घेत, भाजपवर चौफेर टीका केली. कडू यांनी भाजपला रावणाची उपमा दिली. भाजप म्हणजे नामर्दांची औलाद, असे म्हटले. देवेंद्र फडणवीस आतापर्यंतचे सर्वात लबाड मुख्यमंत्री असून, भाजपकडून पैसे घेतले तरी त्यांना मत मारू नका, असे विधान बच्चू कडू यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.