Mohan Bhagwat on Manipur : मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार, देशातील बदलती परिस्थिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगामी काळातील वाटचाल आदी अनेक मुद्द्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकर्ता मंडळ बैठकीत विचारमंथन करण्यात आलं. दोन दिवसांची ही बैठक गुजरातमधील भुज (जिल्हा कच्छ) येथील श्री कच्छी लेवा पटेल समाज, सरदार पटेल विद्या संकुलच्या मातृश्री धनबाई प्रेमजी गांगजी भुडिया कम्युनिटी हॉलमध्ये नुकतीच झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी भारत माता पूजन करीत बैठकीचं उद्घाटन केलं. देशभरातील ११ क्षेत्रांचे (प्रदेश) संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्यांसह सुमारे ३८२ कार्यकर्ते बैठकीत सहभागी होते. संघाचे ४५ प्रांत आणि देशभरातील काही संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्र्यांनादेखील या बैठकीत समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. (All India level brainstorming of Rashtriya Swayamsevak Sangh held in Bhuj of Gujarat, Guided by RSS Chief Mohan Bhagwat)
राष्ट्र आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना या वेळी आदरांजली वाहण्यात आली. यात ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी, मदनदास देवी, प्रसिद्ध वक्ते व लेखक तारेक फताह, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक, माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे संस्थापक सदस्य कमांडर बाळकृष्ण जैस्वाल, डॉ. सुशीला बलूनी, आयएएस पद्मभूषण एन. विठ्ठल यांचा यात समावेश होता.
मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग होता, असं विधान डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथे आयोजित संघाच्या दसरा मेळाव्यात केलं होतं. याशिवाय अनेक मुद्द्यांना डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात स्थान दिलं होतं. यावर अखिल भारतीय कार्यकर्ता चर्चा करण्यात आली. देशात सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी राजकीय परस्थिती आहे. या परिस्थितीनुसार प्रत्येक प्रांतात भविष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल कशी असेल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संघाचा शताब्दी महोत्सव जवळ येतोय. त्यामुळं संघानं गाव तिथं शाखा हे उद्दिष्ट डोळ्यांपुढं ठेवलंय. शताब्दी वर्षात संघाचा चेहरामोहरा कसा असेल, यावरही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. अखिल भारतीय स्तरावर काम करताना संघाच्या स्वयंसेवकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर काम करण्यासाठी कोणते उपाय करायचे, यासंदर्भातील माहिती देण्यात आली. संघाशी अनेक संघटना जोडल्या गेल्या आहे. या संघटनांचा हात हाती घेऊन संघ आगामी काळात कशा पद्धतीनं काम करणार आहे, यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
देशातील राजकारणावर संघाची पकड आहे. ही वस्तुस्थिती असली तरी अखिल भारतीय स्तरावरील या बैठकीत राजकारण आणि आगामी लोकसभा निवडणूक या विषयावर उघड सविस्तर चर्चा टाळण्यात आली. असं असले तरी निवडणुकीच्या काळात काय करायचं, कुणाला साथ द्यायची याबाबत स्वयंसेवक अवगत आहेतच, असे संकेत मिळाले. सनातन धर्माचं रक्षण, धर्मांतराला रोखणं, समाजातील गरजूंना मदत, संघटनशक्ती बळकटीकरण आदी विषयांवरच प्रामुख्यानं जोर देण्यात आला.
Edited By : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.