Akola News : जिथे जातील तिथे काहीतरी सकारात्मक वेगळेपणा दाखवित देशवासियांच्या मनात घर करून जाण्याची कार्यशैली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आहे. असाच काहीसा वेगळेपणा मंगळवारी (ता. 5) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दाखवून दिला.
अमित शाह अकोल्यात होते. लोकसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी पश्चिम विदर्भातील पाच आणि पूर्व विदर्भात एका जिल्ह्याचा आढावा घेतला. शाह यांचा दौरा जाहीर होताच भाजपच्या अनेक नेत्यांसह सर्वसामान्यही त्यांना भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत होते. परंतु शाह यांनी भाजपच्या तळागाळातील बुथ कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला.
अमित शाह (Amit Shah) यांनी आगमन झाल्यानंतर व प्रयाण करण्यापूर्वी दहा बुथ प्रमुख व तालुकास्तरील सगळ्यात तळागाळातील भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. या दहा कार्यकर्त्यांची निवड कोणाच्या वशिल्याने नव्हे तर त्यांच्या कार्याने करण्यात आली होती. या दहा कार्यकर्त्यांना भेटण्यापूर्वी ते कोण आहेत व त्यांनी भाजपसाठी आतापर्यंत कोणते योगदान दिले, याचा ‘रिपोर्ट’च त्यांनी मागविला होता. खात्री पटल्यानंतर त्यांनी या दहा नावांनी मंजुरी दिली.
तळागाळातील कार्यकर्ता नेहमीच आपल्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्याला टीव्ही, फोटोंमधून पाहात असतो. क्वचित प्रसंगी त्याला अशा नेत्याच्या जवळ जाण्याची संधी मिळते. पण त्यातही सुरक्षा रक्षक अशा कार्यकर्त्यांना हुसकावून लावतात. परंतु शाह यांनी या दहा बुथ प्रमुखांच्या माध्यमातून कार्यकर्ताच भाजप (BJP) चा आत्मा असल्याचा संदेश दिला आहे.
शिवणी विमानतळावर भाजपच्या दिग्गज नेत्यांना बाजूला सारत शाह यांनी दहा बुथ प्रमुख व तळागाळातील कार्यकर्त्यांशी बराचवेळ संवाद साधला. त्यातून एका नव्या परंपरेची मुहूर्तमेढ त्यांनी अकोल्यातून रोवली. देवर अंबादास धेगे, राजेश मिश्रा, नरेंद्र गवळी, नितीन खोत, हरीश टावरी, शंकर जयराज, रितेश सबाजकर, अर्चना मसने, संजय इंगळे, राजेश ठाकरे, सुधीर गावंडे, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, रमेश लोहकपुरे, प्रमोद टेकाडे, राजेश रावणकर, रमेश करिहार, संदीप गावंडे या भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांची मंगळवारी अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान ‘लॉटरी’च लागली. या सर्व कार्यकर्त्यांना ‘तुम्हाला अमितभाईंचे स्वागत करायचे आहे’, असा संदेश आधीच मिळाला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षाकडून संदेश मिळाल्यानंतर सर्व दहा कार्यकर्त्यांचे सुरक्षा पास तयार करण्यात आले होते. त्यांना विमानतळावर सुरक्षा तपासणीनंतर प्रवेशही देण्यात आला. टीव्हीवर आणि संसदेत सातत्याने आक्रमक भूमिकेत दिसणाऱ्या शाह यांच वट भाजपमध्ये आहेच. त्यांच्या चेहऱ्यावरूनच अनेकांना त्यांची भीती वाटते. परंतु मंगळवारी अकोल्याच्या शिवणी विमानतळावरील दहा भाजप कार्यकर्त्यांचे हे सगळे समज खोडून निघाले.
त्यांना दिसले अगदी दिलखुलासपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे ‘मोटाभाई’ दहाही कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारताना ना शाह यांनी घाईगडबड केली ना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी कोणाचा मार्ग रोखला. आपण ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षाच्या ‘चाणक्य’ला याची देही, याची डोळा बघण्याची संधी मिळाल्यामुळे भाजपच्या त्या दहा कार्यकर्त्यांना मात्र पक्षासाठी दिलेल्या योगदानाचे कल्याण झाल्यासारखे वाटले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.