Amit Shah In Pune: १८ला अमित शाह पुण्यात, हा निव्वळ योगायोग की ठरवलेला कार्यक्रम?

Pune News: शिवसृष्टीचे उद्घाटन आणि एका सहकार परिषदेसाठी अमित शाह तीन महिन्यांपूर्वी येणार होते.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah will come in Pune : नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता भाजपला इतर चार ठिकाणी पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुळे आता होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाहीये.

अमित शाह १८ व १९ फेब्रुवारीला स्वतः पुण्याला येणार आहेत. येथे त्यांचे इतर दोन कार्यक्रम आहेत. पण राजकीय जाणकार त्याला पोटनिवडणुकीची जोड देत आहेत. पुण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीचे उद्घाटन आणि एका सहकार परिषदेसाठी अमित शाह तीन महिन्यांपूर्वी येणार होते, पण तेव्हा व्यस्त वेळापत्रकामुळे ते येऊ शकले नाही. त्यामुळे आता ते येणार आहेत. नेमक्या याच काळात पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह येणार असल्याने त्याचा संबंध पोटनिवडणुकीशी जोडला जातोय. पण त्यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता, पोटनिवडणुकीशी त्याचा काही एक संबंध नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. इतर कार्यक्रमांसाठी ते येणार असले तरी पोटनिवडणुकीच्या संबंधाने चर्चा होणार, हे मात्र नक्की. यावेळी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ते आढावा घेण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

कोकण वगळता अमरावती व नाशिक पदवीधर आणि नागपूर व औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. नाशिकमध्ये तर भाजपने उमेदवारच दिला नव्हता. तेथे त्यांना उमेदवार मिळाला नाही, अशीच चर्चा निवडणुकीच्या काळात होती. तेथे त्यांनी कॉंग्रेसमधून निष्कासीत झालेले आणि अपक्ष निवडणूक लढविलेले सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिल्याचेही सांगितले जाते. त्यातल्या त्यात नागपूर आणि अमरावतीमधील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला.

Amit Shah
Kasba By-Election : कसब्यात प्रचारासाठी स्वत: अमित शाह उतरणार?

आता भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. त्यामुळे भाजप नेते कुठलीही कसर ठेवणार नाही. या दौऱ्यात राज्यातील नेते निवडणूक संबंधाने अमित शाहांचे मार्गदर्शन घेणारच नाहीत, हेही सांगता येत नाही. त्यामुळे तीन महिन्यापूर्वी रद्द झालेला शाह यांचा दौरा नेमका पोटनिवडणुकीच्याच काळात कसा होत आहे, असाही एक प्रश्‍न आहेच. अमित शाह यांचे पुण्यातील कार्यक्रम आणि पोटनिवडणूक हा योगायोग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. पण हा निव्वळ योगायोग की ठरवून आखलेला कार्यक्रम, याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.

अमित शाह (Amit Shaha) आणि पोटनिवडणुका, हा संदर्भच लागत नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहेत. प्रदेश भाजपची (BJP) संपूर्ण कार्यकारिणी आज नाशिकमध्ये आहे. याचा संबंध तुम्ही कशाशी जोडणार? मोदींच्या मुंबई दौऱ्याचा संबंध तुम्ही महापालिका निवडणुकीशी जोडणार आहात का, असे सवाल करीत अमित शाह आणि पोटनिवडणुकांचा संबंध जोडणे सर्वथा चुकीचे आहे, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. सहकार परिषदेच्या निमित्ताने ते पुण्याला येणार आहेत आणि असे कार्यक्रम म्हणजे भाजपमधील सततची प्रक्रिया आहे, असेही ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com