

Amravati Ashram School : मेळघाटातील धारणी तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नुकतीच विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींना ‘भूतबाधा’ झाल्याच्या अफवांनी खळबळ उडाली आहे.
या अफवांमुळे तब्बल 300 हून अधिक विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडून आपल्या गावी जाण्याचा प्रकार समोर आला आहे.
डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेतील (School) 15 ते 16 विद्यार्थिनी सात ते आठ दिवसांपूर्वी अचानक हसू आणि रडू लागल्या. काही विद्यार्थिनींनी आपल्याला घुंगरांचा आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले. हा प्रकार वसतिगृहाच्या अधीक्षिका उज्वला इंगळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती दुसऱ्याच दिवशी गावात पसरली. त्यानंतर विद्यार्थिनींना (Student) ‘भूतबाधा’ झाल्याची अफवा जोर धरू लागली. या अफवांचा परिणाम विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यात झाला. त्यातून 300 हून अधिक मुलींनी वसतिगृह सोडून आपल्या गावी जाणे पसंत केले. यामध्ये एकताई गावातील विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक शाळेत दाखल झाले. वैद्यकीय तपासणीनंतर हा प्रकार ‘भूतबाधेचा’ नसून मानसिक आरोग्याशी संबंधित हिस्टरीया स्वरूपाचा प्रकार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थिनींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव आणि डॉ. देशमुख यांनीही मुंबईहून अमरावतीत येऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांच्याकडून विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यात आले.
विद्यार्थिनींमध्ये निर्माण झालेली भीती दूर करून त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक चौधरी आणि अधीक्षिका उज्वला इंगळे यांनी दिली.
दरम्यान, विद्यार्थिनींमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थिनींच्या आरोग्याची आणि मानसिक सुरक्षिततेची काळजी घेणे तसेच त्यांना विश्वासाचे वातावरण उपलब्ध करून देणे, हे सध्या प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.