गडचिरोली : जिल्ह्यातील कमलापूरचे हत्ती गुजरातच्या (Gujrat) प्राणिसंग्रहालयात नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण यावर कुणीही तोंड उघडायला तयार नाही. प्राणीप्रेमाचा पुळका असणाऱ्या प्राणिमित्र संघटना प्रतिपक्ष बघून आपली भूमिका बदलतात की काय, असा संशय आता येऊ लागला आहे. कारण गुजरातचे खासगी प्राणिसंग्रहालय एका बड्या उद्योगपतीचे (Businessman) आहे. ते प्रकरण महागात पडेल, असा व्यावहारिक विचार करून तर प्राणिमित्र संघटना आपली भूमिका बदलत नाहीत ना, अशी शंका घ्यायला पूर्ण वाव आहे.
हैदराबाद (Hyderabad) येथील भारतीय प्राणिमित्र संघ संस्थेचे जसराज रूपचंद श्रीश्रीमल यांना महाराष्ट्राच्या (Maharashtra) अमरावती (Amravati) जिल्ह्यातील रब्बारी समाजबांधवांच्या उंटांचा छळ कुठल्यातरी दिव्यदृष्टीने दिसला आणि त्यांनी लगेच धाव घेत धामणगाव रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. शिवाय उंटांना गोशाळेत पाठवून त्यांना कडबाकुटारावर जगण्यास बाध्य केले. पण, अशा प्राणिमित्र संघटना किंवा राज्यातील एकाही प्राणिमित्र संघटनांना गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील पाळीव हत्तींचे दु:ख का दिसत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हैदराबादच्या या प्राणिमित्र संघटनेला गरीब रब्बारी जमातीच्या नागरिकांच्या उंटांचा महाराष्ट्रात होणारा छळ दिसला आणि ते पोलिसात तक्रार करून उंट गोशाळेत पाठवून मोकळे झाले. पण हिच तत्परता एकही प्राणिमित्र संघटना गडचिरोली जिल्ह्यातील हत्तींबद्दल दाखवताना दिसत नाही. कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये असलेले हत्ती पूर्णतः पाळीव आहेत. आजवर त्यांच्या समस्या जाणून घेण्याची तसदी अशा एकाही तथाकथित संघटनांनी घेतली नाही. आता हे हत्ती गुजरात राज्यात पाठविण्यात येणार आहेत. या लांबच्या प्रवासात हत्ती मरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एरवी गल्लीत एखादं कुत्रं केकाटलं तरी धावत सुटणाऱ्या आणि सरकारवर तोंड सोडणाऱ्या नामांकित संघटनाही तोंड उचकटायला तयार नाहीत, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.
खरेतर काही मोठ्या संघटनांचे कॅम्पेनिंग देशातील मोठमोठे तारे, तारका, सेलिब्रेटी करतात. पण देशातील नाही, राज्यातील नाही. विदर्भातील तरी एखाद्याला या हत्तींच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावीशी वाटली नाही. या हत्तींना पुरेसा चारा मिळत नाही, त्यांची हेळसांड होत आहे, त्यांच्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, अशी कारणे हत्ती स्थलांतरणासाठी सांगितली जात आहेत. यासंदर्भातही कधी या परिसराला भेट देऊन सद्य:परिस्थिती जाणून घेण्याची व या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज एकाही प्राणिमित्र संघटनेला वाटली नाही. अनेकदा पिसाळलेल्या कुत्र्यांकडून सामान्य नागरिक विशेषत: लहान बालके जखमी होतात, गाव परिसरात गावठी कुत्र्यांकडून चितळ, सांबर, नीलगाय असे वन्यजीव व गिधाडांसारख्या दुर्मीळ पक्ष्यांवर हल्ले होतात. तेव्हा शांत बसणाऱ्या काही प्राणिमित्र संघटना मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या मोहिमेला सर्रास विरोध करताना दिसतात.
कुत्रे, मांजर, गाय, बैल, घोडे, गाढव अशा सर्व प्राणिमात्रांना सुखाने जगण्याचा अधिकार आहे, त्यांचा छळ होता कामा नये, म्हणून अगदी चित्रपटसृष्टीवरही हंटर उगारण्यात आला आहे. त्यामुळे आता अनेक चित्रपटांमध्ये अॅनिमेटेड प्राणी वापरले जातात किंवा चित्रपटात प्राण्यांचा छळ करून काम करून घेण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण चित्रपट निर्मात्यांना द्यावे लागते. एवढी ताकद असणाऱ्या या प्राणिमित्र संघटना कमलापुरच्या हत्तींसंदर्भात तोंडात मिठाची गुळणी धरून का बसल्या आहेत, असा प्रश्न गडचिरोलीचे नागरिक विचारत आहेत. हे हत्ती जन्मापासूनच पाळीव आहेत. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे सर्व नियम त्यांना लागू होतात. त्यांना एकाएकी त्यांच्या परिसरातून लांब अंतरावर हलविणे, इथे पाच किलोमीटर अंतर सहज मुक्तपणे फिरणाऱ्या हत्तींना अवघ्या अडीचशे एकराच्या खासगी प्राणिसंग्रहालयात बंदिस्त करणे हा या प्राण्यांच्या जीवनाधिकाराच्या हननाचा गंभीर भाग नाही का? तरीही याबद्दल अद्याप एकाही प्राणिमित्र संघटनेने दखल घेतलेली नाही.
ज्या पद्धतीने कुत्रे, मांजर, गाय, बैल व इतर पाळीव प्राण्यांवरील अन्यायाविरोधात प्राणिमित्र संघटना हिरिरीने पुढे येतात. त्याच पद्धतीने या पाळीव हत्तींसंदर्भात त्या काही हालचाल करत असल्याचे दिसून आले नाही. हे पाळीव हत्ती त्यांच्या अनेक वर्षांच्या अधिवासातून बंदिवासात नेण्यात येत आहेत, तरी प्राणिमित्र हरकत घेताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे काही मोठे तथाकथित निसर्गतज्ज्ञही हत्तींच्या स्थानांतरणास समर्थन देत आहेत, हेही अनाकलनीय आहे.
- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.