गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी यांचे सुपुत्र राहुल चौधरी यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजीवसिंह चंदेल यांनी आमदार धोटेंवर निशाणा साधत ते मोजक्याच कार्यकर्त्यांना महत्व देत असल्याचे सांगत घरचा आहेर दिला होता. आता पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेसचे नेते रामचंद्र कुरवटकर यांनीही आमदार सुभाष धोटेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना जास्त महत्व देत असल्याच्या आमदार धोटेंच्या (MLA Subhash Dhote) भूमिकेवरून कुरवटकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता बहुसंख्येने असलेल्या समाजाची मोटबांधणी सुरू करून त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला असलेल्या गोंडपिंपरीत गेल्या दिवसांत एकापाठोपाठ एक धक्क्यांनी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. आमदार सुभाष धोटेंना हे मोठेच धक्के मानले जात आहेत.
विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका येत्या काळात होऊ घातल्या आहेत. अशात काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाचा मोठा फटका बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अशात शेतकरी संघटनेचे नेते अँड. वामनराव चटप यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. यानंतर ॲड. संजय धोटे यांनी विजयश्री मिळवीत भाजपला या क्षेत्रात ओपनींग करून दिली होती.
आमदार सुभाष धोटे हे आता दुसऱ्यांदा या क्षेत्राचे नेतृत्व करीत आहेत. मागील निवडणुकीत ते अतिशय कमी मताधिक्याने विजयी झाले होते. ॲड. वामनराव चटप यांनी मतमोजणीच्या तेविसाव्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली होती. पण शेवटच्या फेरीत त्यांचा पराभव झाला होता. आमदार सुभाष धोटे यांच्या विजयात गोंडपिपरी तालुक्याचे मोठे योगदान राहिले आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने पक्षासाठी काम करीत धोटेंना विजयी केले. पण आता काँग्रेसचे नेते उघडपणे आमदार धोटेंच्या भूमिकेचा विरोध करू लागले आहेत.
राहुल चौधरी, राजीव चंदेल यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर यांनीही आमदार सुभाष धोटेंच्या भूमिकेवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढतेय, असा अपप्रचार हेतुपुरस्सर पसरविण्यात येत आहे. पण हा निवळ भ्रम आहे. पक्षासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वारंवार होत असलेल्या उपेक्षेने आता रामचंद्र कुरवटकर यांनीही टोकाची भूमिका घेतली आहे.
गेल्या काही दिवसांत गोंडपिंपरीतून आमदार सुभाष धोटे यांना त्यांचेच कार्यकर्ते धक्क्यांवर धक्के देत आहेत. रामचंद्र कुरवटकर हे काँग्रेसचे गोंडपिपरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते आहेत. ते पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यांनी आमदारांवर निशाणा साधत घेतलेल्या भूमिकेने तालुक्यात नवे राजकीय संदर्भ बघायला मिळणार आहेत.
आमदारांच्या विजयात ज्यांनी योगदान दिले. त्यांचे पंख छाटण्याचे काम नव्याने पक्षात आलेले काही लोक करताहेत. आमदार सुभाष धोटे त्यांनाच महत्व देत आहेत. अनेकांनी या भूमिकेचा विरोध केला आहे. आता समाजाची मोट बांधून आपण वेगळी भूमिका घेणार आहोत.
रामचंद्र कुरवटकर, माजी उपसभापती, पंचायत समिती, गोंडपिपरी.
आमदार धोटे म्हणतात इनकमींग सुरू..
काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आमदार धोटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. काल आमदार धोटे गोंडपिंपरीत होते. त्यांना रामचंद्र कुरवटकर नाराज असल्याबाबत विचारले असता, आमच्याकडे भरपूर इनकमींग सुरू आहे. अनेक पक्षांतील कार्यकर्ते येत आहेत. कुरवटकर, चंदेल हे पक्षातील ज्येष्ठ लोक असून ते अद्यापही पक्षातच आहेत. मागील जि.प. पं.स. निवडणुकांत आलेले अपयश यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते मोठे यश मिळवून धुऊन काढतील, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.