Ashok Chavan's Resignation : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल (ता. 12) राजकीय बॉम्ब फोडला, अन् महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आता नागपुरात शंका, कुशंकांना पेव फुटले आहे. कोण जाणार, कोण थांबणार, हा प्रश्न चर्चिला जात आहे. पण दोन नेत्यांवर तगडा संशय घेतला जात आहे.
कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणार का, या प्रश्नावर नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले की, ‘प्रश्नच नाही, कॉंग्रेस सोडून जाण्याचा विषयच नाही.’ असे असले तरी परवा-परवापर्यंत अशोक चव्हाणही हेच बोलत होते. पण त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला, हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे नागपूर शहर, जिल्ह्यातील काही नेत्यांकडे संशयाच्या नजरेने बघितले जात आहे. Ashok Chavan Resignation
अद्याप कोणीही यास होकार दिला नसला तरी यामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकमेकांकडे संशयाने बघितले जात आहे. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा गट त्यांच्यासोबत होता. चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जायचे. चव्हाण यांनी मुत्तेमवार-ठाकरे गटाला महापालिकेच्या निवडणुकीत झुकते माप दिले होते. दीडशेपैकी सुमारे शंभर जागा त्यांच्या समर्थकांना दिल्या होत्या. त्यामुळे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व माजी मंत्री नितीन राऊत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता.
काही कार्यकर्त्यांनी याचा राग चव्हाण यांच्यावर शाई फेकून काढला होता. याच कारणामुळे पुढे चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात अनेक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यात आमदार विकास ठाकरे यांचाही समावेश होता. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्याने सध्या शहरातील समीकरण बदलले आहे. मुत्तेमवार विरोधक प्रमुख नेते एकत्र आले आहेत.
मुत्तेमवार-राऊत-चतुर्वेदी सार्वजनिक कार्यक्रमांना ‘एकसाथ’ सहभागी होत आहेत. विकास ठाकरे यांचे नाना पटोले यांच्यासोबत आता सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे ते जातील, असे सध्या तरी कोणालाच वाटत नाही. त्यांनीसुद्धा यास नकार दिला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे त्यांच्याकडे नेहमीच संशयाने बघितले जाते. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा ते भाजपचे उमेदवार राहतील, अशी जोरदार चर्चा होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपनेसुद्धा त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केला नव्हता. अशा प्रकारे ठाकरेंच्या मदतीसाठी भाजपने अप्रत्यक्षरीत्या प्रयत्न केल्याची चर्चा आजही नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे. उत्तर नागपूर राखीव मतदारसंघ असल्याने नितीन राऊत यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. सावनेरचे माजी आमदार सुनील केदार यांचा विषय कोर्टकचेऱ्यांमुळे संपला आहे. उमरेडचे आमदार राजू पारवे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अशोक चव्हाण यांच्या यादीत त्यांच्याही नावाचा समावेश असल्याचा दावा त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करीत आहेत.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.