Ashok Chavan's resignation : एकीकडे गॉडफादर तर दुसरीकडे पक्षाची बांधिलकी, आमदार झनक काय करणार?

MLA Amit Zanak : जिल्ह्यात आमदार झनक समर्थकांची संभ्रमावस्था; झनकांचा पक्ष सोडण्यास नकार.
Amit Zanak and Ashok Chavan
Amit Zanak and Ashok ChavanSarkarnama

Ashok Chavan's resignation : तब्बल तीन पिढ्या कॉँग्रेससोबत तर तिन्ही पिढ्यांचे अघोषित पालकत्व नांदेडच्या चव्हाण कुटुंबाकडे, अशा राजकीय पार्श्वभूमीवर नांदेडकरांनी कॉँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याने रिसोडच्या झनक घराण्याच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमदार अमित झनक यांनी कॉँग्रेससोबतची प्रतिबद्धता जाहीर केली असली तरी पक्षनिष्ठेसमोर अशोक चव्हाण यांचा निर्णय डोईजड ठरतो की काय, अशी भीती निष्ठावंत कॉँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तद्वतच त्यांनी आपल्या आमदार पदाचासुद्धा राजीनामा दिला आहे. त्या अनुषंगाने चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेला उधाण आले आहे. मराठवाड्यातील राजकीय भूकंपाचे पडसाद वाशीम जिल्ह्यात जाणवत आहेत. या पडसादामागे झनक घराण्याच्या तीन पिढ्यांचा चव्हाण घराण्यासोबतचा पाच दशकांचा राजकीय घरोबा कारणीभूत आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून आजतागायत रिसोडचे झनक घराणे चव्हाणांच्या छत्रछायेत राहिले आहे.

Amit Zanak and Ashok Chavan
Ashok Chavan Resignation : अमित झनक काँग्रेस सोडणार? नेमकी वस्तुस्थिती काय?

तीन पिढ्यांपासून कॉँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले झनक घराणे संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित आहे. त्याच बळावर आमदार अमित झनक यांनी रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर हॅट्ट्रिक साधत आज ते विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थकसुद्धा आपसूकच कट्टर काँग्रेस समर्थक म्हणून गणले जातात, परंतु माजी मंत्री स्व. सुभाषराव झनक यांचे नांदेडच्या चव्हाण घराण्याशी असलेले घरोब्याचे संबंध, त्यातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात स्व. सुभाषराव झनक यांना दिलेले कॅबिनेट मंत्रिपद, या सर्व गोष्टी लक्षात घेता आमदार अमित झनक यांचे राजकीय गॉडफादर म्हणून चव्हाण परिचित आहेत.

त्याच अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, अशी अटकळ व्यक्त केली जात असताना आमदार अमित झनक यांनी पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले असले तरी सध्याच्या राजकारणात कधी काय घडेल, याची शाश्वती नसल्याने जिल्ह्यात चर्चांना पेव फुटले आहे.

झनकांना भाजपमध्ये स्पेस किती?

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे समर्थक असलेल्या आमदार अमित झनक यांनी चव्हाणांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर झनकांना भाजपमधे किती स्पेस मिळणार, असा प्रश्न निर्माण होतो. कारण झनक यांचे राजकीय प्रतिस्पर्धी माजी मंत्री अनंतराव देशमुख आधीच भाजपमधे डेरेदाखल झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशमुख विरुद्ध झनक या मुद्द्यावरच रिसोड विधानसभेचे राजकारण फिरत असल्याने झनक गॉडफादरसोबत जाण्याची राजकीय घोडचूक करणार नाहीत, असा राजकीय मतप्रवाह आहे. काँग्रेस पक्षात आमदार झनकांचे एकहाती वर्चस्व व मतदारसंघात काँग्रेस पक्षाची लोकप्रियता या बाबींचा विचार झनकांकडून केला जात असल्याने सध्या तरी आमदार अमित झनक काँग्रेससोबत आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. मात्र, आपणास कॉँग्रेस पक्षाने भरभरून प्रेम दिले आहे. धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधिलकी ही झनक घराण्याची शिदोरी आहे. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षासोबतच एकनिष्ठ आहोत, असे आमदार अमित झनक यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com