Nagpur News : पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरांनी रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला.
दोन्ही बंडखोर भाजपच्या मतांमध्ये वाटेकरी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीऐवजी बंडखोरांमुळे भाजपचेच टेन्शन वाढले आहे.
भाजपचे (BJP) कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत याच मतदारसंघाने नितीन गडकरी यांना सर्वाधिक 80 हजारांचे मताधिक्य दिले आहे. असे असले तरी 2019च्या निवडणुकीत खोपडे यांच्या तुलनेत नवखे असलेले, माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी खोपडे यांना चांगलेच झुंजवले होते. आपण सहज निवडून येतो, एक लाखांचे मताधिक्य मिळेल हा खोपडे यांचा अहंकार त्यांनी मोडून काढला होता. अवघ्या 23 हजार मतांनी खोपडे निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा काँग्रेसची उमेदवारी मिळेल, अशी आशा हजारे यांना होती. मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे येथील उमेदवार आहेत. हजारे आणि खोपडे एकाच समाजाचे आहेत. या मतदारसंघात तेली समाजाचे प्राबल्य आहे. दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश सचिव तसेच महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी आमदार खोपडे यांच्या पराभवासाठी आपण बंडखोरी करीत असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
खोपडे आणि पांडे यांचे जुने वैर आहे. पूर्व नागपूरमध्ये हिंदी भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आभा पांडे यांचा सर्व जोर प्रामुख्याने हिंदी भाषिक मतदारांवरच आहे. हे बघता दोन्ही बंडोखोर उमेदवार भाजपच्याच मतांवर डल्ला मारणार असल्याचे दिसून येते. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या पथ्यावर पडू शकते.
मात्र मतदारसंघ हिसकावून घेतल्याने त्यांना आधी काँग्रेससह आपल्याच सहकाऱ्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे. महाविकास आघाडीने नागपूर जिल्ह्यात उमेदवारी वाटप करताना जातीय समीकरणाचा विचार केला नाही. ही बाब अनेक समाजांना खटकत आहे.याचाही निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.