Bacchu Kadu on Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन इंजिनच्या सरकारमध्ये बिघाडसुद्धा होऊ शकतो. तो बिघाड होऊ नये म्हणून बैठकांवर बैठका सुरू आहेत. सध्या खातेवाटपाचा गोंधळ सुरू आहे. काहीही झाले तरी अजित पवार अर्थमंत्रिपदी नको, अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे. (No matter what happens, Ajit Pawar should not be Finance Minister)
मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही गावाकडे चालले, असे विचारले असता, मुंबईत राहिलं म्हणजे मंत्रिपद मिळते आणि गावी राहिलं म्हणजे मिळत नाही, असं काही नाही. मिळायचे ते मिळणारच आहे आणि मंत्री राहिलो किंवा नाही, काम तर करावेच लागणार आहे, असे आमदार कडू म्हणाले.
राष्ट्रवादीच्या येण्याने सरकारमध्ये कुठेतरी मोठी नाराजी आहे. शिंदे गटातील आमदारांना असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे बैठकांवर बैठका सुरू आहेत. सर्व घडामोडी अचानक झाल्या. त्यामुळे चिंतेचा विषय आहेच. कुणाला कोणतं खातं द्यायचं, पालकमंत्रिपदी कोणत्या जिल्ह्याचे कुणाला द्यायचे, अशा अनेक भानगडी आहेत. दिसायला बरेचदा सोपं दिसतं, पण आतून पोखरलेलं असतं, असे म्हणत बच्चू कडू यांनी आजच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
मंत्रिमंडळात समावेश झाल्यास तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल, असे विचारले असता, मला कुठल्याही पालकमंत्रिपदाची अपेक्षा नाही. जी जबाबदारी आली, ती पार पाडू पण मंत्रिपदासाठी अद्याप फोन आलेला नाही, असे सांगताना आजघडीला सर्व आमदार मुंबईत आहे, पण मी गावी चाललो, हाच माझ्यात आणि त्यांच्यातला फरक आले, असे कडू म्हणाले.
ज्या घडामोडी सध्या राज्यात सुरू आहेत, त्यावरून आनंद कुठेही नाही. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांमध्येही नाराजी आहे. आमदारांची नाराजी होणारच आहे. अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाऊ नये, ही आमच्या गटातील आमदारांची मागणी आहे. कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचा कारभार आम्ही पाहिलेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना ते झुकते माप देणार आणि इतर आमदारांकडे दुर्लक्ष करणार. त्यामुळे अर्थमंत्री पदी अजित पवार नकोच, असे बच्चू कडू म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण तिसरा आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रिपदं गेल्याने आधी आलेल्या आमदारांवर अन्याय होणारच आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घासातला घास खाणारा राष्ट्रवादी इथे आला आहे. त्यामुळे आपला नंबर कटला, ही नाराजी असणारच आहे.
तिन्ही नेत्यांनी चांगल्या पद्धतीनं सरकार (Government) चालवलं तर महायुती घट्ट होईल. एखादा माणूस कितीही मोठा गुंडा असला, पण त्याने एखाद्याचा जीव वाचवला, तर त्याचं कौतुक होतं. सरकार विकासाच्या कामासाठी चर्चेला आलं तर चांगले परिणाम होईल, असे सांगताना शिंदे (Eknath Shinde) गटाला किती मंत्रिपदे मिळतील, याची मला कल्पना नाही, असेही आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.