
Amravati agitation demands : माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलनातील मागण्यांवर महायुतीने कार्यवाही करण्यास प्रारंभ केला.
महायुतीमधील सत्ताधारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिष्टाई केली. आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास खात्यातील विविध योजनांमध्ये दिव्यांग, विधवा आणि कष्टकरी घटकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी (Farmers) कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सात दिवस बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं होतं. या आंदोलनात त्यांची प्रकृती देखील खालावली होती. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय समाज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षासह महायुतीविरोधातील बहुमतांशी पक्षांनी पाठिंबा दिला.
बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे आंदोलन ताणल्यानंतर राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाची संघटना आक्रमक झाली होती. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केले होते. जलसमाधीपासून, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. रास्ता रोको, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांनी दखल घेत बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. यानंतर शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत आंदोलनावर यशस्वी तोडगा काढला. अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती. उपचारानंतर त्यांनी महायुती सरकारकडून मिळाल्या आश्वासनांसाठी आता पाठपुरावा सुरू केला आहे.
महायुतीमधील सत्ताधारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुढाकार घेत बच्चू कडू यांच्या मागण्यांवर कारवाई सुरू केली आहे. रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेशी संबंधित मागण्यांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत रोजगार हमी योजनेंतर्गत दिव्यांग, विधवा व कष्टकरी घटकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बच्चू कडू दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, उपसचिव अरविंद पगार, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव मराळे, दिव्यांग कल्याण विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या सर्व मजुरीची कामे मनरेगांत समाविष्ट करावीत, फळपिके व दुग्धव्यवसायालाही 'मनरेगा'शी जोडावे, 'मनरेगा'मधील मजुरी 312 रुपये वरून 500 रुपये करण्यात यावी, दिव्यांग व विधवांना दरमहा 6 हजार रुपये मानधन द्यावे, असे माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून, योग्य तो अभिप्राय घेऊन त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असा सकारात्मक प्रतिसाद रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.