Maharashtra Political News : मनासारखे मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आता थेट अयोध्येतील श्रीरामाला शरण जाणार आहेत. दसऱ्यानंतर लगेचच २९ ऑक्टोबरला ते प्रभू रामचरणी नतमस्तक होणार आहेत. त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. (The question whether the government in the state and the center is not in the interest of the farmers has been discussed)
बच्चू कडू म्हणाले, आम्ही अयोध्येला पोहोचून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहोत. देवाला कापूस, ऊस, संत्री, सोयाबीनचा नैवेद्य अर्पण करणार आहोत. या सरकारला बुद्धी दे, ही प्रार्थना प्रभू रामचंद्राकडे करणार आहोत. राष्ट्रवादी किसान दलाने आम्हाला आमंत्रित केले आहे. शहिदांचे स्मरण व्हावे आणि शेतकऱ्यांचे मरण होऊ नये, यासाठी ‘मेरा देश मेरा खून’ हे अभियान आम्ही राबवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार यावे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरणे व्हावीत. यासाठी आम्ही येत्या २९ ऑक्टोबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहोत. शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांसाठी आर्थिक आरक्षण निर्माण व्हावे. यासाठीदेखील आमची लढाई असणार आहे. आमचे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, की सरकारच्या बाजूने आहे हे सरकारने शोधावे. आम्ही मागणी करत आहोत.
सरकारमध्ये आहोत म्हणून मागणी करू नये, असा काही कायदा नाही. सरकारला वाटले की हे आंदोलन विरोधात आहे. तरी त्याची कोणतीही काळजी नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. शेतकरी आणि शेतमजुरांना सोबत घेऊन एक आंदोलन आम्ही सुरू करत आहोत, आम्ही आता आर्थिक आरक्षणाची लढाई सुरू करणार आहोत. आम्ही संपूर्ण भारतभर फिरणार आहोत.
शहिदांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही हे अभियान काढत आहोत, असे बच्चू कडू म्हणाले. राज्य सरकारमध्ये सत्तेचे वाटेकरी असतानाही आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आता बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार यावं, अशी मागणी श्रीरामचरणी करणार असल्याचे सांगत सध्या राज्यात व केंद्रात असलेल्या सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही का, या प्रश्नाला वाचा फोडली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात उघड नाराजीही व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारवही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपण बच्चू कडू यांच्याशी चर्चा करू, असे स्पष्ट केले. त्यानंतर बच्चू कडू यांनी वाघनखांबाबत सामंजस्य करार करायला गेलेले राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही टीका केली होती.
आता सरकारला सुबुद्धी प्राप्त व्हावी म्हणून बच्चू कडू थेट भाजपला प्रिय असलेल्या श्री रामाच्या चरणीच नतमस्तक होणार असल्याने त्यांना नेमकं हवंय तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. बच्चू कडू यांचा हा अयोध्या दौरा आगामी काळात चांगलाच गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.