Bhandara-Gondia Politics : लोकसभा 2024च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवार निवड करण्यापासून तर प्राबल्य चाचपणी सुरू झालेली आहे. दरम्यान ही चाचपणी करण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी जिल्ह्यात ठाण मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या या सर्व दिग्गज नेत्यांचा हल्ली मुक्काम भंडारा - गोंदिया जिल्ह्यातच पाहायला मिळत आहे. जिल्ह्याला आपले नेते वेळ देत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच उत्साह संचारला आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक पक्षांसह जिल्ह्यातील नेत्यांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नेत्यांची सक्रियता अचानकपणे वाढली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दौऱ्यावर आले. उद्घाटन, भूमिपूजन, कार्यकर्त्यांच्या बैठकांची आखणी करून त्यांचे दौरेही सोशल मीडियावर झळकायला लागले आहेत. भाजप नेते डाॅ. परिणय फुकेही त्यात मागे नाहीत. गेल्या महिन्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात झळकलेल्या बॅनरनंतर ते जनसंपर्कात असल्याचे दिसत आहे.
भाजप खासदार सुनील मेंढे हे एक पाय नागपूर-दिल्लीत तर दुसरा पाय भंडाऱ्यात ठेऊन कामात गुंतले आहेत. तर दुसरीकडे सतत जिल्ह्याबाहेर पाहिले जाणारे प्रफुल पटेल हेसुद्धा जिल्ह्यात आपले पाय रोवून बसल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याभरत अनेक दौरे त्यांचे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे तिकीट कोणाला मिळणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट मिळत नसले तरी नाना पटोलेंची सक्रियता बरेच काही सांगणारी आहे.
दुसरीकडे भाजपमध्येसुद्धा इच्छुकांची गर्दी वाढत चालली आहे. एरवी दोन नेत्यांत असलेली चढाओढ आता भाजपच्या आजी-माजी आमदार खासदारांपर्यंतही पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून काही नावे चर्चेत आहे. मात्र, उमेदवार हा गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील असावा, असा सूर माजी आमदार रमेश कुथे व काही नेत्यांनी शनिवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आळवला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून स्थानिक उमेदवार देण्याची पंरपरा आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे पक्षसुद्धा निश्चित याचा विचार करेल. पण शक्त्तिप्रदर्शन करण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे कुथे म्हणाले. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहू, असेही कुथे सांगायला विसरले नाहीत. त्यामुळे नेत्यांचा लोकलचा सूर, मात्र पक्षाचा निर्णय मान्य या वक्तव्याने जिल्ह्यात भाजपच्या गटात सध्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडीत काँग्रेस मात्र आपले पत्ते उघडण्यास सध्यातरी तयार नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.