Bhandara News : ‘जी हुजूरी’ काय असते हे जर पाहायचं असेल तर कुठल्याही सरकारी कार्यालयात बघायला मिळेल. एखाद्या कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यालाही जी हुजूरी करणारे कर्मचारीच पसंत पडतात. भंडाऱ्यात असे उदाहरण आपल्याला सहज पाहायला मिळत आहे. कारणही तसेच आहे. एका नगर परिषदेत नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याधिकारी साहेबांना भंडाऱ्यात घर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांची ही अडचण लक्षात घेऊन माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी महोदयांना भाड्याचे घर मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
साहेबांना अद्यापही घर पसंत पडत नसल्याने, किंबहुना घरच मिळत नसल्यामुळे माजी नगरसेवकांची दमछाक सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी साहेबांना खूश करण्यासाठी ‘एकसाथ’ कामाला लागलेल्या माजी नगरसेवकांवर ‘कुणी घर देता का, घर..’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही सर्व परिस्थिती बघता भंडाराकरांना मात्र माजी नगरसेवकांची धावपळ बघेनाशी झाली आहे. जेव्हापासून नगर परिषदेवर प्रशासक राज सुरू झाले आहे, तेव्हापासून मुख्याधिकारी पद अधिक महत्त्वाचे ठरले आहे.
आपल्या वार्डात काम झाले पाहिजे म्हणून मुख्याधिकारी साहेबांची मर्जी संपादित करणे माजी ठरलेल्या नगरसेवकांना क्रमपात्र ठरले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तीन वर्षे पूर्ण झालेल्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे असेल ते बिराड घेऊन मुख्याधिकारी साहेबांना आपल्या आपल्याला मिळालेल्या नियुक्तीच्या ठिकाणी पोहोचणे क्रमपात्र ठरले आहे. बदलीनुसार भंडारा जिल्ह्यातही मुख्याधिकारी आपले कार्यभार स्वीकारण्यासाठी हजर झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नव्याने आलेल्या मुख्याधिकाऱ्यांची एक मोठी अडचण झाली आहे. त्यांना आपल्यासाठी एक भाड्याचे घर हवे आहे. भंडारा नवीन असल्यामुळे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत घराची शोध मोहीम सुरू केली आहे. तरीपण त्यांना इच्छित असे घर मिळालेले नाही. ही बाब काही माजी नगरसेवकांसाठी आशादायी ठरली.
माजी नगरसेवक आणि चक्क मुख्याधिकाऱ्यांना गाठत आपण आपल्याला उत्तम घर मिळवून देऊ, अशी हमीच दिली. आता शब्द दिला तसं माजी नगरसेवक एकसाथ कामाला लागले. काही माजी नगरसेवकांनी साहेबांना घरसुद्धा दाखवले. मात्र साहेबांना घर काही पसंत येईना. त्यामुळे सर्व माजी नगरसेवक साहेबांना खूश करण्यासाठी घर शोधण्याच्या मोहिमेवर आहेत.
त्याचे कारणही तसेच आहे. माजी नगरसेवकांची अनेक काम पेंडिंग आहेत. काहींनी तर चक्क अतिक्रमण करून ठेवलेले आहेत. दरम्यान आपली कामे व्हावी आणि आपण केलेले अतिक्रमण उघडकीस येऊ नये, म्हणून काही माजी नगरसेवकांनी आल्या-आल्या साहेबांना खूश करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र साहेबांना अद्यापही घर मिळाले नसल्याने त्यांचे हे प्रयत्न अद्याप तरी सफल झालेले नाहीत. आता या ‘जी हुजूरी’ प्रकाराची भंडारा जिल्ह्यात चवीने चर्चा रंगू लागली आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.