Bhandara District News : गत वर्षापासून नववर्षाची सुरुवात भंडाऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासाठी चांगली होत नसल्याचे यावर्षी पुन्हा दिसले. गत वर्षीच्या सुरुवातीला २०२२ मध्ये त्यांनी मोहाडी पोलिसांना शिवीगाळ केली होती. त्यासाठी त्यांनी जेलची हवासुद्धा खाल्ली. हे प्रकरण जिल्हावासी विसरत नाही, तोच यावर्षीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
यावर्षी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा आमदार कारेमोरेंवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे आलेले नवीन वर्ष ही आमदार राजू कारेमोरेंसाठी चांगले सुरू झाले नसल्याचे दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना प्रशासक, ग्रामसेवक, मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना आहे.
मोहाडी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वरठी आणि एकलारी या दोन ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनी मोहाडी-तुमसर विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे हे आचारसंहितेचे उल्लंघन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आश्विन शेंडे यांनी निवडणूक आयोग तसेच भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, यावर हे आमदार कारेमोरेंचे भवितव्य ठरणार आहे. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २९ डिसेंबर २०२२ पासून विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळेच यावर्षी प्रजासत्ताक दिनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी यांच्याच हस्ते ध्वजारोहण झाले.
दरम्यान जिल्ह्यातील शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्येसुद्धा शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या हस्तेच ध्वजारोहण झालेही. मात्र मोहाडी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी गट विकास अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत चक्क आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी (Republic Day) ज्या ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक किंवा ग्रामसेवक हे दोघेही उपलब्ध नसतील, त्या ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण कार्यक्रम मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचे हस्ते पार पाडण्यात यावा, असे पत्र भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीच्या गट विकास (BDO) अधिकारी पल्लवी वाडेकर यांनी २५ जानेवारी रोजी काढले होते.
गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र असतानाही मोहाडी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वरठी आणि एकलारी या दोन ग्रामपंचायत कार्यालयांत प्रशासक तरोणे आणि ग्रामसेवकासह शेकडो विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांच्या उपस्थितीत आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे प्रशासक (Administrator) आणि ग्रामसेवक असताना लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे कारण काय? आमदारांनी आचार संहितेचे (Code of Conduct) उल्लंघन केले नाही का? असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आश्विन शेंडे यांनी उपस्थित केले आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी लवकरच होणार असून राजू कारेमोरे यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल होणे, जवळपास निश्चित मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.