भंडारा : मोहाडी- तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन अश्लील शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांना अटक करून दुसऱ्या दिवशी सुटका करण्यात आली. सध्या अंतरिम जामिनावर बाहेर असलेले कारेमोरे यांच्या जामिनावर आज भंडारा (Bhandara) सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज ते सुटकेचा मोकळा श्वास घेतील की त्यांना पुन्हा कोठडीत जावे लागेल, याचा फैसला दुपारी २.३० वाजताच्या नंतर होणार आहे.
आमदार राजू कारेमोरे यांच्याकडून ॲड. राकेश सक्सेना, ॲड. किशोर लांजेवार आणि ॲड. सोनाली अवचट बाजू मांडणार आहेत, तर भंडारा पोलिसांकडून सरकारी वकील ॲड भोले आणि ॲड. टवले बाजू मांडणार आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास आपल्या व्यापारी मित्राला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार कारेमोरेंनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टिका झाली. आमदार-पोलिस वाद रंगणार हे वृत्त ‘सरकारनामा’ने दिले होते.
घटनेच्या तीन दिवसांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत भंडारा पोलिसांनी कलम 353, 354, 294, 504, 506, 143, 147, 149 IPC r/w 135 मुंबई पोलीस कायद्यानुसार मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये घातलेल्या गोंधळ व शिवीगाळ प्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना भंडारा शहर पोलिसांनी 3 जानेवारीला अटक केली होती. आमदार राजू कारेमोरे यांना मोहाडी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमांमुळे त्यांना मोहाडी कोर्टाने जामीन नाकारत 15 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र आमदारांच्या वकिलांनी त्याच दिवशी तत्काळ भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनाकरिता अर्ज केला होता. 3 जानेवारीला आमदारांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र जामिनाची सर्टिफाइड कॉपी मिळण्यासाठी उशीर झाल्याने शिवाय भंडारा पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना रात्रीच तुरुंगात सुपूर्द केल्याने 3 जानेवारीची रात्र त्यांना तुरुंगात काढावी लागली होती. तब्बल 12 तास तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर राजू कारेमोरे यांची 4 जानेवारीला सुटका करण्यात आली. त्यांना भंडारा सत्र न्यायालयाने 15 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने आज त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळेल की पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागेल, हे आज दुपारनंतर कळणार आहे.
दरम्यान, कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे (31 डिसेंबर) रात्री 9 च्या वाजताच्या सुमारास घरून 50 लक्ष रुपयांची रोकड वाहनातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडिकेटर का दाखवला नाही, म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच कारेमोरे हे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांच्या व्यापारी मित्राजवळील 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी पळविली असल्याचा आरोप करीत धिंगाणा घातला. यानंतर त्यांची व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक केली होती. आता याप्रकरणी त्यांना आज जामीन मिळतो की, त्यांच्या अडचणीत वाढ होते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.