Nagpur News: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय, मराठी भाषा, महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी संस्कृतीवर हल्ला असल्याचे माकपचे म्हणणे आहे. पक्षाचे बहुतांश नेते हिंदी भाषिक असताना आणि बहुतांश कार्यक्रम हिंदीतून करणाऱ्या माकपच्या या भूमिकेने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तर भारतीयांचे मते आपल्याकडे वळण्यासाठी भाजपचा हा खटाटोप असल्याचाही आरोप माकपने केला आहे.
माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हिंदी बद्दल व इतर सर्वच भाषांबद्दल आम्हाला आदरच आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणे अयोग्य असून हिंदी बाबत करण्यात आलेली सक्ती सरकारने तातडीने मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून विद्यार्थ्यांना अनिवार्य करायची हे केवळ संतापजनक नसून निषेधार्हही आहे.
भाजप याद्वारे आपला द्वेषमूलक, मतदान केंद्री व विभाजनवादी अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृती कमजोर केल्याशिवाय देशाच्या काही भागात ज्या प्रकारचे राजकारण आहे त्या प्रकारचे असहिष्णू, द्वेषमूलक राजकारण या महाराष्ट्राच्या मातीत रुजणार नाही याची जाणीव असल्यामुळेच भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदी भाषेच्या सक्तीची खेळी खेळली गेली आहे. हिंदी भाषेबद्दल नसणारी द्वेष भावना यामुळे महाराष्ट्रात निर्माण होऊन ती महाराष्ट्रात रुजण्याचा धोकाही या पार्श्वभूमीवर निर्माण झाला असल्याचे माकपचे म्हणणे आहे.
भारत हा विविध भाषा, संस्कृती व परंपरांनी नटलेला देश आहे. भाषा, संस्कृती व परंपरांमधील हे वैविध्य आपल्या देशाला समृद्ध करत आले आहे. मात्र भाजप व संघ परिवाराला, हे 'विविधतेत एकता' हे तत्व मान्य नसल्याने त्यांना देशातील विविध भाषा, संस्कृती व परंपरांना सुरुंग लावून त्यात एकारलेपणा आणावयाचा आहे. एक देश एक भाषा हे धोरण त्यांनी यासाठी घेतले आहे.
मराठीचा या धोरणासाठी बळी देण्याचे पाऊल हिंदी सक्तीचे करून त्यांनी टाकले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या निर्णयाचा मुहूर्त निश्चित केलेला दिसतो आहे. मुंबई मधील मराठी भाषिकांना जाती धर्मांमध्ये आपसात झुंजवत ठेवायचे व दुसऱ्या बाजूला उत्तर भारतीय मते हिंदी भाषेच्या आधारे आपल्याकडे वळवायची हा भारतीय जनता पक्षाचा यामागे डाव आहे. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी मराठी भाषा व मराठी संस्कृतीचा बळी देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपही माकपने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.