BJP Leader : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची मुंबईतील गोरेगाव येथील तीन एक एकर जागा सहकार भवनाला देण्यासाठी कार्यकारी परिषदेला नाईलाजाने मंजुरी द्यावी लागली. सहकार विभागाचे मुख्य सचिव तुकराम मुंढे यांच्या स्वाक्षरीनिशी आलेला हा प्रस्ताव कार्यकारी परिषदेच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला होता. त्यात हो किंवा नाही हाच एकमेव प्रस्ताव परिषदेच्या सदस्यांसमोर ठेवण्यात आला होता. यावर विचार करण्यासाठी वेळसुद्धा देण्यात आली नव्हती.
गुरुवारी (ता. 7) सकाळी ११ वाजता माफसू विद्यापीठात बैठक बोलावली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत मंजुर झालेला प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याचे अप्रत्यपणे बजावण्यात आले होते. परिषदेवर नेमलेले सर्वच सदस्य शासननियुक्त असल्याने या प्रस्तावाला विरोध करण्याची हिंमत कोणीच दाखवली नाही. भीतीने सर्वांनी माना डोलावल्या आणि तीन एकर अतिशय मोक्याची व कोट्यवधी रुपयांची किंमत असलेली जागा सहकार भवन उभारण्यासाठी देण्यात आली.
या पापाचे आपण भागीदार होऊ नये आणि भविष्यात कोणी दोषी ठरवू, नये याची खबरदारी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी घेतली. प्रस्ताव मंजूर करताना फक्त शैक्षणिक कामांसाठीच जागेचा वापर केला जावा, असे मत नोंदवून सर्वांनी आपली या पापातून सुटका करून घेतली. या प्रस्तावावर माफसूचे कुलगुरु आणि कुलसचिवांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावरून सर्वांवर प्रचंड दडपण असल्याचे दिसून येते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
असा आहे इतिहास..
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आधी कोकण विद्यापीठांतर्गत येत होते. विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्मिती करण्यात आली. त्यानंतर गोरेगाव येथील जागा नागपूर येथे स्थापन झालेल्या विद्यापीठाकडे हस्तांतरित झाली. संशोधन आणि शिक्षणासाठी विद्यापीठाला जागा मिळावी, याकरिता १९७८ साली विद्यार्थ्यांनी जेलभरो आंदोलन केले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारला विद्यापीठासाठी १४५ एकर जागा देणे भाग पडले होते. त्यानंतर येथे इमारत उभारून महाविद्यालय सुरू करण्यात आले होते.
शासन आदेशात खाडाखोड..
आज झालेल्या बैठकीत सर्व सदस्यांसमोर अजेंडा ठेवण्यात आला होता. त्यात माफसूच्या जागेच्या संदर्भातील १९७८ सालचा एक शासनादेश जोडण्यात आला होता. त्यातील तिसऱ्या क्रमांकाचा नियम डिलिट करण्याता आला होता. संबंधित जागा विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याशिवाय कोणालाही, कुठल्याही परिस्थिती देता येणार नाही, असा उल्लेख तिसऱ्या क्रमांकाच्या नियमात आहे. तो कोणाच्या निदर्शनास येऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.
मुंबईतील या जागेसाठी यापूर्वी प्रसिद्ध उद्योजक अंबानी आणि टाटा यांनी प्रयत्न केले होते. केंद्र सरकारने स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी जागा मागितली होती. मात्र पशुसवंर्धन खात्याचे तत्कालीन मंत्री आणि विद्यापीठाचे अधिकारी व कार्यकारी परिषदेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासले. कुठल्याही दबावाला बळी पडले नाही. आता मात्र सत्तधाऱ्यांनीच प्रस्ताव दिल्याने सर्वांचा नाईलाज झाला. कुठलीही शासकीय जागा परत घ्यायची असल्यास ती महसूल विभागाकडे द्यावी लागते. नंतर या विभागामार्फत दुसऱ्या विभागाला द्यावी लागते. सध्या महसूल व पशुसंवर्धन खाते एकाच मंत्र्याकडे आहे.
सरसंघचालकांचे कॉलेज..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत याच विद्यापीठात शिकले. त्यांनी काही काळ येथे नोकरीसुद्धा केली. राज्यात भाजपची सत्ता असताना २०१६च्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्यावतीने सरसंघचालकांना ‘डीलीट' दिली होती.
‘देवदत्त'चे अध्यक्ष कोण?
देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्थेनेच्यावतीने ब्रुहन्मुंबईतील सहकारी संस्थांकरिता सहकारी भवन उभारण्यासाठी माफसूचा भूखंड देण्यात यावा, असा अर्ज संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडेही अर्ज करण्यात आला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या अर्जावर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र नावे देण्यात आली नाहीत. ही संस्था भाजपच्या सहकार क्षेत्रातील एका बड्या नेत्याची असल्याचे समजते.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.