Chandrapur Loksabha Election 2024 : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेत नितीन गडकरी यांनी अगदी केंद्रातील मंत्री असल्यासारखेच भाषण ठोकले. आदर्श आचार संहिता सुरु असल्याचा विसर त्यांना पडल्याचे चित्र होते. हा रस्ता परवा मंजुर केला, तो रस्ता लवकरच करु असे सांगत नितीन गडकरी यांनी जोरदार बॅटिंग केली. पण, हे सांगताना विदर्भाच्या विकासात सिंचनाचे महत्व अधोरेखित केले. एक्करी पाच क्विंटल कापुस आणि सोयाबीन हाताशी आल्याने विकास साधला जाणार नाही. याची जाणीव त्यांनी करुन दिली. महावितरणवर विश्वास न ठेवता सोलर पंप लावण्याचा सल्ला गडकरींनी पांढरकवडा येथे दिला.
या भागात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या खऱ्या समस्या असून या समस्या दूर करायच्या असतील तर त्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग, सिंचन प्रकल्प आणण्याची गरज आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. आजचे राजकारण हे गढूळ झाले असून आता राजकारणाची व्याख्या बदलविण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकारण म्हणजे 'माल दो.... काम लो....'
केंद्रिय मंत्री असताना नितीन गडकरी यांनी पन्नास लाख कोटींचे कामे केल्याचा दावा केला आहे. तर पांढरकवडा हिंगणघाट हा रस्ता विकसित करण्याची गरज व्यक्त केली. खराब रस्त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी देखील मागितली. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात पक्षाचे काम, विकास आणि आपण 10 वर्षांत केलेली विकासकामे याबाबत माहिती दिली. भाषणात त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षावर टीका केली नाही.आजकाल राजकारण हे पैसे कमावण्याचा धंदा बनला आहे, पण त्याविषयी कुठेही बोलता येत नाही. एखाद्या मतदारसंघात काम करायचे असेल तर 'माल दो काम लो' अशी परिस्थिती आहे. परंतु मी इथे बसलेल्या आमदाराबाबत हे बोलत नाही तर दुसऱ्यांबद्दल बोलतो आहे, असा मिश्कील टोलाही गडकरी यांनी लगावला.
जोपर्यंत 60 टक्के सिंचन होत नाही, तोपर्यंत शेतकरी समृद्ध होणार नाही. यासाठी आता जनतेनेच पुढे यायला पाहिजे. शेतातील पाणी शेतात, गावातील पाणी गावातच जिरविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनतेनेच नेतृत्व केले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचीही भाषणे झाली.
यावेळी गडकरी यांनी चंद्रपुर लोकसभा मतदार संघात भाजप चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली. इतकेच नाही तर त्यांच्या सारखा नेता दिल्लीत पाहिजे असे म्हणत चंद्रपुरच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ट्रिपल इंजिनची शक्ती कामात येईल, असे ही गडकरी यांनी सांगितले. सिंचन, रोड, विकास, टुरिझम आणि शेतकऱ्यांकरीता चांगला नेता म्हणुन सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. एकदा सुधीर मुनगंटीवार यांना निवडुन द्या पाच वर्षात बघा कसा 'करंट' लागेल. दुष्काळी भागाला सुखी समृध्द करण्याची ताकद सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहे. चंद्रपुर मतदार संघाचा तीन नाही चार पट विकास होईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.