Nagpur News: मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने माजी अर्थमंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात असंतोष आहे. ते भाजपच्या कार्यक्रमांना हजर राहत नाहीत. सहकार्य करीत नाही अशा चर्चा आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी मात्र या चर्चांना काही अर्थ नसल्याचे सांगितले.
पालकमंत्री या नात्याने घेतलेल्या सर्व बैठकांना मुनगंटीवर, जोरगेवार, बंटी भांगडिया यांच्यासह सर्वच भाजपचे आमदार उपस्थित असतात. ते सहकार्य करतात. निधी वाटपावरूनही कुठलीच भांडणे चंद्रपूर जिल्ह्यात नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महायुती सरकारमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डच्चू दिला आहे. यात मुनगंटीवर यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना चांगलाच धक्का बसला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात मुनगंटीवार सहभागी झाले नव्हते. मंत्रिमंडळातील समावेशावरून त्यांची वक्तव्ये चांगलीच गाजली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला त्यांनी उघडपणे विरोध दर्शवला होता. थेट केंद्रीयमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी जोरगेवार यांना प्रवेश देऊन आणि चंद्रपूरची उमेदवारी भाजपने जाहीर केली होती. भाजप नेत्यांच्या निर्णयाला उघडपणे विरोध केल्याने त्यांचा मंत्रिमंडाळातून पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे.
वाघनखे नागपूर आणल्यानंतर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाला मुनगंटीवर यांना आमंत्रित केले होते. मात्र ते आले नाहीत. चंद्रपूर येथे माजी मुख्यमंत्री स्व.दादासाहेब कन्नमार यांच्या स्मृतिदिनाच्या चंद्रपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमातही ते आले नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी चंद्रपूर जिल्हा ‘वारांचा‘ असून कुठल्याच वारांना आम्ही रिकामे ठेवणार नाही असे सूचक विधान आपल्या भाषणातून केले होते. यावेळी त्यांच्या गाडीतून किशोर जोरगेवार आल्याने ते नेमके कुठल्या वारांबाबत म्हणाले याची चांगलीच चर्चा रंगली होती.
या सर्व वादावर बोलताना चंद्रपूरचे पालकमंत्री उइके म्हणाले, "मला असा कुठलाच वाद भाजपच्या आमदारांमध्ये दिसला नाही. उलट सर्व आमदारांचे सहकार्य लाभले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुनगंटीवर, जोरगेवार हेसुद्धा उपस्थित होते. त्यांच्यात निधी वाटवापरूनसुद्धा कुठलाचा वाद झाल्याचे आढळले नाही. हे सर्व वाद मीडियात आहेत. प्रत्यक्षात आपसात सलोखा असल्याचा दावाही उइके यांनी केला.