नागपूर : शिवसेनेतील नाराजांचा फायदा घेत शिवसेनेला खिंडार पाडत बंडखोरांना साथ भाजपने सत्ता स्थापन केली. त्याच धर्तीवर कॉंग्रेसच्या नाराज सदस्यांच्या मदतीने भाजप जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलविण्याच्या प्रयत्नात आहे. कॉंग्रेसमधील नाराज आणि पदावर डोळा ठेवून असलेले नाना कंभाले यांना भाजप मदत करण्याच्या तयारीत आहे. कंभाले कॉंग्रेसला खिंडार पाडून सदस्यांना गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्याची जोरदार चर्चा नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात आहे.
कॉंग्रेसने सावधगिरी म्हणून सदस्यांना गुप्तस्थळी हलविले. परंतु त्यांच्यासोबत तीन सदस्य नाहीत. यात नाना कंभालेसह मेघा मानकर, प्रितम कवरे यांचा समावेश आहे. मानकर यापूर्वी भाजपमध्ये (BJP) होत्या. पक्षाकडून तिकीट नाकारल्याने त्यांनी कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश घेतल्याची चर्चा आहे. तर कवरे हे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांचे विरोधक आणि आशिष देशमुख (Ashish Deshmukh) गटातील असल्याचे सांगण्यात येते. कंभाले यांनी पक्षासोबत उघडपणे बंड पुकारला आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच त्यांना स्वतःला अध्यक्षपदाचा दावेदार घोषित केले होते. कॉंग्रेसमधील काही सदस्यांना त्यांनी आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्नही सुरू केला होता.
अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांनी उपाध्यक्षपदासाठी हालचाली सुरू केल्या. सहलीला न गेलेल्या दोन सदस्यांनाही ते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्नात आहे. प्रितम कवरे हे अनुसूचित जमातीमधील असल्याने कंभाले गटाकडून ते अध्यक्षपदाचे उमेदवार राहण्याची दाट शक्यता आहे. केदार विरोधी गटातील काही सदस्यांना त्यांचे समर्थन राहण्याची शक्यता आहे. एका महिला पदाधिकाऱ्याची सहानुभूती कंभालेंसोबत आहे. त्यांच्या कक्षात बैठकाही झाल्या. या महिला पदाधिकाऱ्यास पुन्हा पद मिळणार नाही. त्यांना पुन्हा पद हवे असल्याने त्यांचे कंभालेंच्या बंडांना समर्थन मिळण्याची शक्यता आहे. या पदाधिकाऱ्यामुळे जिल्हा परिषद काही वेळा अडचणीत आल्याने अनेक नेतेही त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येते.
कंभाले भाजपमध्ये गेल्याची चर्चा..
कंभाले यांच्या बंडाला भाजपकडून रसद पुरविण्यात येत आहे. कंभाले यांना हवे असलेले उपाध्यक्षपद देण्याची तयारी भाजपने केली आहे. प्रसंगी अध्यक्षपदही बंडखोरांना देण्याची तयारी भाजपची असल्याचे सूत्रांकडून समजते. सर्व पद बंडखोरांना देण्याचे आमिषही कंभाले यांना भाजपकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्या दृष्टिकोनातून कंभालेंकडून इतरांना आमिष देण्यात येणार असल्याचे समजते. यासंदर्भात कंभाले व भाजप नेत्यांमध्ये यापूर्वी चर्चा झाल्याचे समजते. आता कंभाले भाजपशी थेट हात मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.
बावनकुळे साथ देणार?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व नाना कंभाले दोघेही राजकीय विरोधक समजले जातात. कामठी विधानसभा मतदार संघावर कंभाले यांनी दावा केला होता. परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारली. कंभाले यांना पाडण्यासाठी बावनकुळे यांनी पूर्ण प्रयत्न केले होते. त्यामुळे कंभाले यांना बावनकुळे साथ देतील का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
बावनकुळे घेणार निर्णय..
निवडणुकीबाबत आज भाजपची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, महामंत्री किशोर रेवतकर, विरोधी पक्ष नेते आतिश उमरे व सर्व सदस्य उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत उद्या अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.