भाजपचे ‘ते’ नगरसेवक गटाचा प्रस्ताव देऊन झाले नॉट रिचेबल, फडणवीसांकडे झाली तक्रार...

या सर्व प्रकाराची तक्रार माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे.
Charan Waghmare and Devendra Fadanvis
Charan Waghmare and Devendra FadanvisSarkarnama

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मोह़ाडी नगरपंचायतीत सत्ता स्थापनेचा घोडाबाजार तेजीत आला असून मोह़ाडी नगरपंचायतीचे भाजपचे ‘ते’ ४ नगरसेवक आपल्या वेगळ्या गटाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) देऊन परस्पर नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे आता मोह़ाडी नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय (Political) गोंधळ उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात तणावपूर्ण राजकीय शांतता बघायला मिळत आहे.

या सर्व प्रकाराची तक्रार माजी आमदार चरण वाघमारे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली असून आता मोह़ाडी नगरपंचायतीचा निर्णय धरमपेठ येथील बंगल्यावर होणार असल्याची माहिती आहे. मोह़ाडी नगरपंचायतीची चर्चा राज्यभर सुरू आहे. कारण अध्यक्षपदाची निवडणूक भाजपमध्ये (BJP) होणाऱ्या राजकीय भूकंपास कारणीभूत ठरणार आहे. मोह़ाडी नगर पंचायतीसाठी भाजपच्या दोन गटांचे स्वीकृती पत्रासाठी निवेदन आल्याने भाजपमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजप नगरसेवक यादोराव कुंभारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आघाडीकडून भाजपच्या 5 नगरसेवकांचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे सहीने एका गटाने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपचा अधिकृत गट असल्याच्या दावा करत प्रमाणपत्रासाठी मागणी केली आहे.

भाजपचा दुसरा गट ज्योतिष जयदेव नंदनवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी विचारमंच नगर विकास आघाडीकडून भाजपच्या ४ नगरसेवकांच्या दुसऱ्या गटाने जिल्हाधिकारी कडे भाजपचा अधिकृत गट असल्याच्या दावा करत अधिकृत प्रमाणपत्रासाठी मागणी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर ४ नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहे. ते ४ नगरसेवक पिकनिकला गेल्याची चर्चा मोहाडीत रंगू लागली आहे. याउलट हे ४ नगरसेवक राष्ट्रवादीचे समर्थन मिळवून मोहाडी नगर पंचायतीवर सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप ४ नगरसेवकांचा गट नगरपंचायत अध्यक्षपद, एक स्वीकृत सदस्य, एक सभापतिपद घेऊन राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद, एक स्वीकृत सदस्य, दोन सभापतिपद देऊन सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

Charan Waghmare and Devendra Fadanvis
भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी पोहोचली चरम सीमेवर...

या संपूर्ण घटनाक्रमात चरण वाघमारे यांचा तिसरा गट अधिक पेचात सापडला आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांनी हे चार नगरसेवक गायब असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आता मोह़ाडी नगरपंचायतीमध्ये सत्तास्थापनेचा विषय धरमपेठ येथील बंगल्यावर होणार आहे. यात भंडाऱ्यात घडणाऱ्या सर्व राजकीय घडामोडींवर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चरण वाघमारे यांना काळजी न करण्याचा सूचक मेसेजही दिल्याचे कळते. कारण आयती मिळालेली मोह़ाडी नगरपंचायत व सत्तेत प्रबळ दावेदारी असलेली मोह़ाडी व तुमसर पंचायत समिती गमावणे भाजपला सध्यातरी परवडणारे नाही. आता स्वतः देवेंद्र फडणवीस भंडाऱ्यात लक्ष देत असल्याचे म्हटल्यावर निर्माण झालेला गटबाजीचा हा पेच सोडविता येतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com