देशापासून तर राज्यस्तरावर काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप-काँग्रेस संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. असे असतानाही बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाला रोखण्यासाठी काँग्रेसने भाजपशी सलगी केली. (Congress allied with BJP)
या अनपेक्षित हातमिळवणीची चर्चा परिसरात चांगलीच रंगू लागली आहे. काँग्रेस-भाजप ला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट तसेच शिंदे गट एकत्र आले आहेत. बाजार समितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी परवा गुरूवारी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होईल अशी शक्यता होती. मात्र, अखेरच्या क्षणी काही ठिकाणी आघाडी युती फिसकटली.
वेगवेगळे समीकरण तयार करून नवा जुगाड करण्यात आला. आघाडी,युतीची घडी विस्कटल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. यवतमाळ, दिग्रस, नेर, बाभुळगाव, वणी, पुसद तसेच महागाव या सात बाजार समितीसाठी २८ एप्रिलला तर दारव्हा, बोरी अरब, कळंब, राळेगाव, झरीजामणी मारेगाव, आर्णी तसेच घाटंजी या सात ठिकाणी रविवारी ३० एप्रिलला मतदान होऊ घातले आहे.
यंदा पहिल्यांदाच शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अर्जाची संख्या वाढल्याने कोण कुणाकडून लढणार यांचे अंदाज लावले जात होते. इच्छुकांची संख्या वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली. उमेदवारी मागे घेतानाच शह-काटशहाचे राजकारण अनुभवायला मिळाले.
१५ पैकी काही बाजार समितीमध्ये सोईस्करपणे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तसेच महायुतीचा धर्म मोडून नवे जुगाड करण्यात आले. काही बाजार समितीमध्ये (Congress) काँग्रेस-ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची आघाडी झाली असून राष्ट्रवादी (NCP) स्वतंत्र लढणार आहे.
काही ठिकाणी राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत स्थानिक राजकारण वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे. सोईस्कर जुगाड असले तरी खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होण्याचीच शक्यता अधिक आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.