चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचे नाव शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून जवळपास निश्चित झाले होते. मात्र रात्रभरात सूत्र हलली आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना जैसे थे ठेवण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला. शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदे यांच्या हातून निसटण्याची ही दुसरी वेळ आहे. यामागे नेमकी कोणती 'महाशक्ती' आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मागील तीन वर्षांपासून संदीप गिऱ्हे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख (District Chief) पद सांभाळत आहेत. त्यांच्याकडे चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजूरा विधानसभेची जबाबदारी आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख नितीन मत्ते जुगार प्रकरणात अडकले आणि पक्षाने त्यांची पदावरुन उचलबांगडी केली. त्यांच्याऐवजी मुकेश जिवतोडे यांच्याकडे भद्रावती, चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभेचे जिल्हाप्रमुखपद देण्यात आले. जिवतोडे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून पाच महिन्यांचा कार्यकाळ झाला आहे. भद्रावती विधानसभेचे शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसमध्ये गेले. त्यामुळे या मतदार संघात आता शिवसेनेत नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल, असा चेहरा सेनेकडे नाही. दरम्यान शिंदे यांनी आपल्या आपल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू झाली. शिंदे सुद्धा या मतदार संघात वर्चस्व असलेल्या राजकीय पक्षाच्या शोधात होते. त्यांनी सेनेचे दार ठोठावणे सुरू केले. जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षनेतृत्वाकडे फिल्डिंग लावली. मत्ते यांची उचलबांगडी झाल्यानंतर शिंदे यांचा पक्षप्रवेश जवळपास निश्चित झाला होता. त्यावेळी माशी शिंकली आणि शिदेंचा प्रवेश बारगळला. दरम्यान राज्यात शिवसेनेत फूट पडली. पक्षाची पडझड झाली. त्यानंतर पुन्हा चंद्रपूर जिल्हा शिवसेनेत खांदेपालट होईल, अशी चर्चा सुरू झाली.
विशेषतः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या जागेवर शिंदे यांना जबाबदारी देण्यात येईल, हे जवळपास निश्चित झाले होते. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर, विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांनीही शिंदे यांच्या नावाला पसंती दिली. शिंदे यांची जिल्हा प्रमुख म्हणून औपचारिक घोषणाच केवळ बाकी होती. या घडामोडीमुळे विद्यमान जिल्हाप्रमुख अस्वस्थ झाले. त्यांनीही आपली सूत्र हालवली आणि शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाने पुन्हा शिंदे यांना हुलकावणी दिली.
राजीनामा नाट्याचा परिणाम..
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी शिंदेच्या नियुक्तीला विरोध करीत काल मंगळवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याची दखल पक्षनेतृत्वाने घेतली. त्यांचा राजीनामा मागे घ्यायला लावला. दोन्ही जिल्हा प्रमुखांना मुंबईला बोलावून घेतले. आज कदम, गिऱ्हे आणि जिवतोडे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती ठाकरेंना दिली. त्यानंतर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासोबत या तिघांची बैठक झाली. ज्यांना पक्षात यायचे असेल ते येऊ शकतात. मात्र आल्याबरोबर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली जाणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दोघांचाही जीव भांड्यात पडला. कदम यांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याची कबुली दिली. पक्षात सर्वांचेच स्वागत आहे. परंतु पद देताना ज्येष्ठताही बघितली जावी, एवढीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.