Gadkari On Caste Wise Census : जनतेच्या नव्हे तर पुढाऱ्यांच्या मनात असते जात; जातीनिहाय जनगणनेला गडकरींचा विरोध !

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी जातीनिहाय जनगणनेला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला.
Nitin Gadkari and Prashant Damle
Nitin Gadkari and Prashant DamleSarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari Political News : जात ही जनतेच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात असते. सर्वच राजकीय पक्ष सोयीनुसार त्याचा वापर करीत असतात. आपण मात्र जाती व्यवस्थेच्याच विरोधात असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीनिहाय जनगणनेला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला. (Gadkari indirectly opposed the caste-based census)

'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आज (ता. २१) देशपांडे सभागृहात आयोजित केलेल्या ‘मनातले गडकरी‘ या मुलाखतीत ते बोलत होते. सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट कलावंत प्रशांत दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली. सध्या महाराष्ट्रात ओबीसी, मराठा, धनगर यांची आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी अलीकडे जोर धरत आहे.

बिहार राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली असून, सत्तेवर आल्यास विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन जनतेला देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांना जातीनिहाय जनगणनेबाबत आपले मत काय, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर थेट विरोध दर्शवला नाही वा समर्थनही त्यांनी केले नाही. परंतु जातीच्या नेत्यांनी जातीच्या कार्यकर्त्यांसाठी काय केले, असा उलट प्रश्न विचारला.

कुठलाही नेता जातीच्या कार्यकर्त्याला मोठा करीत नाही. उलट आपला वारसदार म्हणून बायको, मुलगा, मुलगी नाहीच कोणी भेटलं तर ड्रायव्हरला समोर करतो. जातीच्या आधारावर मते मिळातात हासुद्धा फोलपणा आहे. मंडल आयोगाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आरक्षणाला उघड विरोध केला होता. भाजपने मंडल आयोगाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, निवडणुकीत आमच्यापेक्षा शिवसेनेचे आमदार अधिक निवडून आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना वेगवेगळं गणित आणि आराखडे विचारात घ्यावे लागतात. मेरीटनुसार उमेदवारी ही भाजपचे धोरण आहे. जनतेने मतदान करताना कोणी जातीचा पातीचा यापेक्षा कोण कामाचा, प्रामाणिक उमेदवार, याचा विचार केल्यास जात ही समस्या संपेल. आम्ही जेव्हा विकासाचे काम करतो तेव्हा जात, धर्म बघत नाही.

ज्या किमतीत हिंदूना सिलिंडर मिळते तीच रक्कम मुस्लिमांनाही मोजावी लागते. याकरिता मानवी स्वभाव बदलावा लागेल. ही लांबलचक प्रक्रिया आहे. त्यासाठी सर्वच समाजघटकांना सर्वांना मेहनत घ्यावी लागले. या देशाला सुधारावयाचे असल्यास प्रयत्नांच्या सागराची गरज असल्याचे सांगून गडकरी यांनी जाती व्यवस्था एक ना एक दिवस संपुष्टात येईल, असा विश्वासही या वेळी व्यक्त केला.

Nitin Gadkari and Prashant Damle
Nitin Gadkari News : न्यायालयातील वकिलांनाही धन्यवाद, असं का म्हणाले गडकरी !

माझा वारसदार कार्यकर्ताच...

माझा राजकीय वारसदार माझ्या कुटुंबातील कुठलाच सदस्य राहणार नाही. यावर भाजपच्या कार्यकर्त्याचा पहिला हक्क आहे, असे ठामपणे गडकरी यांनी सांगतिले. भाजपच्या कार्यकर्त्यांच्याच भरोशावर मी इथपर्यंत मजल मारू शकलो. त्यामुळे तेच खरेखुरे वारसदार आहेत. माझ्या मुलाला भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनवावे, अशी विनंती करण्यात आली होती. तेव्हा मी स्पष्टपणे नकार दिला होता. तुमचा आग्रहच असेल तर मी राजीनामा देतो, असे सांगितल्यावर ते परत गेल्याचे गडकरी यांनी सांगितले.

प्रचार नाही, आशीर्वाद घेणार...

आगामी निवडणुकीत मी स्वतःचे फोटो, बॅनर छापून प्रचार करणार नाही. दहा वर्षांत जी विकासाची, लोककल्याणाची कामे केली, जनतेची सेवा केली, त्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जाईल. लोकांचे आशीर्वाद घ्यायला बाहेर पडेल. ज्यांना मी चांगला नेता, माणूस आहे, असे वाटेल ते मला मतदान करतील. दारू, मटणाच्या पार्ट्या देणार नाही. याचा काही फायदा होत नाही. लोक हुशार असतात. सर्वच लोकांकडून घेतात मात्र मतदान स्वतःच्या मनाने करतात, असेही विनोदाने या वेळी गडकरींनी  सांगितले.

Edited By : Atul Mehere

Nitin Gadkari and Prashant Damle
Nitin Gadkari Maharashtra Politics : गडकरींना बढती मिळणार; केंद्रात की राज्यात ? वडेट्टीवारांच्या शुभेच्छा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com