
Chandrapur BJP : कधी काळी आमदार किशोर जोरगेवार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हात धरून राजकारणात आले. पण त्याच मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातून आता विस्तवही जात नाही. आधी मुनगंटीवार यांनी जोरगेवांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला. त्यानंतरही भाजपच्या वरिष्ठांनी जोरगेवारांना पक्षप्रवेश दिला आणि तिकीटही दिले.
आता दोघांमध्ये चंद्रपूरच्या पक्षसंघटनेवर ताबा मिळविण्याच्या मुद्द्यावरून वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतरही शहराची नवी कार्यकारिणी विहीत मुदतीत गठीत होवू शकलेली नाही. आपल्याला महानगर अध्यक्षपद मिळेल, यासाठी या नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा जीव मात्र सध्या टांगणीला लागला आहे.
2009 पर्यंत मुनगंटीवार चंद्रपूरचे आमदार होते. पण 2009 मध्ये मतदारसंघ राखीव झाला आणि मुनगंटीवार बल्लारपूरला गेले. त्याचवेळी चंद्रपूरमध्ये भाजपमधील अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली. त्यापैकीच एक होते सुधीर मुनगंटीवार यांचा हात धरुन राजकारणात आलेले किशोर जोरगेवार. त्यावेळ मुनगंटीवार जोरगेवार यांनाच तिकीट देण्यासाठी आग्रही होते. पण त्यांना भाजपचे तत्कालिन खासदार हंसराज अहिर यांचा खोडा होता. मुनगंटीवार आणि अहिर यांच्या संघर्षात जोरगेवारांचे नाव फायनल होत नव्हते.
त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूरच्या नाना शामकुळे यांना चंद्रपूरला पाठविले. शामकुळेंना चंद्रपूरमध्ये प्रचंड विरोध झाला, बाहेरचा उमेदवार म्हणून टीका झाली. त्या वादळात जोरगेवारांनी भाजपची साथ सोडली. पण मुनगंटीवार व अहिर यांनी गडकरींपुढे नमते घेतले आणि शामकुळे पहिल्यांदा आमदार झाले. 2014 मध्येही असाच विरोध असताना ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यावेळी जोरगेवार यांनी बंडखोरी करत शिवसेनेकडून निवडणूक लढवत 50 हजार मते घेतली.
2019 मध्ये जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. 2024 ला मात्र जोरगेवार यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची गरज भासू लागली. पण मुनगंटीवार यांच्या विरोधामुळे त्यांनी आधी तुतारीची चाचपणी केली. मग शिवसेनेमार्गे त्यांनी भाजप प्रवेश झाला. मुनगंटीवार यांचा विरोध डावलून वरिष्ठांनी जोरगेवारांना पक्षात सामावून घेतले. आता त्यांच्यातील वितुष्टाचा आणखी नवा अध्याय बघायला मिळत आहे. वर्चस्वाच्या लढाईत आता पक्षसंघटनेवर ताबा मिळविण्यासाठी दोघांचेही शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या पक्षसंघटनेवर नेहमीच मुनगंटीवार गटाचेच वर्चस्व राहिले आहे. पण आता या वर्चस्वाला जोरगेवार यांचे हादरे बसू लागले आहेत. आजवर पालिकेचे उमेदवारसुद्धा मुनगंटीवार ठरवायचे. परंतु, त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही. तेव्हापासून जोरगेवार आणि पक्षांतर्गत विरोधक त्यांच्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न करीत आहे. अशात चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महानगर अध्यक्षपद महत्त्वाचे राहणार आहे.
सध्या चंद्रपूरची संबंध कार्यकारिणी त्यांच्या बाजुने उभी आहे. जोरगेवारांकडे केवळ यंग चांदा बिग्रेडचे आणि भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांचा विरोधी गट दिसून येते. पण भाजप प्रदेशाध्यक्षांनी 20 मार्चला चंद्रपूर शहरातील मंडळ अध्यक्ष आणि शहराची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यासंदर्भात पत्र पाठवविले आहे. 10 एप्रिलपर्यंत मंडळ अध्यक्ष घोषित करायचे होते. 20 एप्रिलपर्यंत महानगर अध्यक्ष आणि शहराची कार्यकारिणी जाहीर करायची आहे.
मात्र, मंडळ अध्यक्ष घोषित करण्यासाठी आणि पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आधी बुथ अध्यक्ष आणि मतदार यादी प्रमुखांची नियुक्ती करायची होती. परंतु, यातील काहीच झाले नाही. आता मंडळ अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, त्यांनीही अद्याप काम सुरू केले नाही. त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. यासाठी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वर्चस्वाची लढाई यासाठी कारणीभूत ठरल्याचे चित्र आहे.
महानगर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत मुनगंटीवार समर्थक राहुल पावडे, विशाल निंबाळकर, सूरज पेद्दुलवार, प्रज्जल कडू, तर जोगरेवार गटाकडून दशरथसिंग ठाकूर, सुभाष कासनगोट्टवार, अमोल शेंडे यांची नावे चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.