

Chandrapur Municipal Corporation News : चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ते खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खेम्यातील मानले जातात. स्थायी समितीत धानोरकर समर्थकांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे धानोरकर कोणती भूमिका घेतात, यावर काँग्रेसचे सभापतीपदाचे उमेदवार वसंता देशमुख यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सोळा सदस्यीय स्थायी समितीत भाजप–उबाठा युतीचे आठ सदस्य आहेत, तर काँग्रेस आणि जनविकास सेनेचे आठ सदस्य आहेत. त्यामुळे दोन्हीकडून दगाफटका झाला नाही, तर ईश्वर चिठ्ठीशिवाय पर्याय राहणार नाही. भाजपमध्येही आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नगरसेवकांची विभागणी झाली आहे. स्थायी समितीत दोन्ही गटांचे नगरसेवक पाठविण्यात आले आहेत. उबाठाला स्थायी समितीचे सभापतीपद देण्यास भाजपने मान्यता दिली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यास त्यांचे नगरसेवक एकसंघ राहतील.
उबाठाकडून मनस्वी गिऱ्हे यांनी सभापतीपदासाठी नामांकन दाखल केले आहे. मात्र काँग्रेसचे सभापती पदाचे उमेदवार वसंता देशमुख यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खासदार धानोरकर समर्थकांची नावे प्रदेशाध्यक्षांनी सुचवूनही डावलण्यात आली. त्यामुळे नाराज खासदार धानोरकर नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. पप्पू देशमुख यांच्या पाठिंब्याशिवाय वसंता देशमुख यांची ईश्वर चिठ्ठी निघणे कठीण मानले जात आहे. या परिस्थितीतून वसंता देशमुख कसा मार्ग काढतात, हे 16 मार्चला होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट होईल.
उपमहापौरपदासाठी काँग्रेसतर्फे वसंता देशमुख यांनी नामांकन दाखल केले होते. त्यावेळी सर्वप्रथम विरोध पप्पू देशमुख यांनीच केला होता. भ्रष्टाचाराला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, तसेच त्याचे पुरावे सादर करू, अशी भूमिका पप्पू देशमुख यांनी माध्यमांसमोर मांडली होती. त्यामुळे आता त्यांच्या समोर नैतिकतेचाही प्रश्न उभा राहिला आहे. ज्यांचा जाहीर विरोध केला, त्यांच्याच पाठीशी उभे राहणे त्यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडगाव प्रभागातून वरिष्ठ नगरसेवकांची उमेदवारी कापून पप्पू देशमुख यांच्या जनविकास सेनेला 3 जागा दिल्या. ते तिन्ही उमेदवार विजयी झाले. काँग्रेसकडून उपमहापौरपदाचा उमेदवार म्हणून वसंता देशमुख यांनी नामांकन दाखल केले होते. ते मागे घेऊन पप्पू देशमुख यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आली. यात खासदार धानोरकर यांनीच निर्णायक भूमिका बजावली होती.
दुर्देवाने ते ईश्वर चिठ्ठीत बाद झाले. त्यामुळे खासदार धानोरकरांचा शब्द देशमुख खाली पडू देणार नाहीत, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पप्पू देशमुख बाजूने राहिले तरच वसंता देशमुख ईश्वर चिठ्ठीसाठी पात्र ठरतील.
नगरपालिका निवडणुकीत आणि त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भूमिका घेण्यासंदर्भात आमच्या संघटनेतर्फे त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
-पप्पू देशमुख, नगरसेवक तथा अध्यक्ष, जनविकास सेना
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.