Nagpur : अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिली गेली आहे. कोण जाणार, कोण नाही, याच्या चर्चा आणि त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशात उद्धव ठाकरेंनी अयोध्येला अवश्य जावे, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
अयोध्या मंदिर आणि श्रीरामाच्या दर्शनासाठी आपण भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत उद्घाटनानंतर जाणार असल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. तत्पूर्वी निमंत्रण असल्याने उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जावे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. अयोध्येला प्रत्येक कार्यकर्त्याने जावे, याची सूचना भाजपला देण्याची गरज नाही. या देशातील प्रत्येक व्यक्ती आज ना उद्या अयोध्येला दर्शनासाठी जाणारच आहे. त्यासाठी आम्हाला कुणी सांगण्याची गरज नाही.
22 जानेवारीला महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार आपापल्या मतदारसंघातील श्रद्धास्थानात राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा व कार्यक्रम साजरा करणार आहे. देशातील जनता धार्मिक आंदोलन म्हणून या सोहळ्यात सहभागी होणार आहे. कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी ट्रस्टच्यावतीने पाच हजार रामभक्तांना अयोध्येला नेण्याचे ठरवण्यात आले आहे. अशा अनेक संस्था आहेत. ते आपापल्या भागातील नागरिकांना अयोध्येला नेणार आहेत. आमदार आणि खासदार कोणाला घेऊन गेले तर त्यात काही गैर नाही. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.
नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा करण्याचा सर्वांना अधिकार आहे. अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे, हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण होत आहे. मात्र उद्धव ठाकरे अयोध्येला का जात नाही, त्यांना कशाची ‘ॲलर्जी’ आहे, असे बाळासाहेबांना ते जिथे असतील तेथे वाटत असेल. ‘इंडिया’ आघाडीतील स्टॅलिन यांच्या मुलाने सनातन धर्मावर टीका केली. त्यांना हिंदू धर्म संपवायचा आहे आणि अशांसोबत उद्धव ठाकरे राहतात, याकडेही आमदार बावनकुळे यांनी लक्ष वेधले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अयोध्येत श्रीरामाचे मंदिर खुले होत असल्याने हा दिवस जगभरातील रामभक्तांसाठी दीपोत्सवापेक्षा कमी नाही. त्यामुळे या उत्सवात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. श्रीरामाचा वनवास जरी त्रेतायुगात संपला होता तरी त्यांची जन्मभूमी असलेल्या श्रीराम मंदिराचा वनवास खऱ्या अर्थाने आता संपणार आहे. मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर रामलल्लांचे दर्शन घेताना भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल असेही बावनकुळे म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.