
RSS controversy Maharashtra : शताब्दी वर्ष साजरा करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खोडी काढली आहे.
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार भेदाभेद आणि चतुर्वर्ण व्यवस्थेला पोषक, असा आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा आदर करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा,' अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ नागपूर दौऱ्यावर होते. माध्यमांशी संवाद साधताना, हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मोठी मागणी केली. विशेष म्हणजे, शताब्दी वर्ष साजरे करीत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ थेट बरखास्तीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "काँग्रेसचा विचार संविधानाने प्रेरित आहे. त्यात कुठलाही लपलेला अजेंडा नाही. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार भेदाभेद आणि चतुर्वर्ण व्यवस्थेला पोषक असेच आहे. दोन ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी महात्मा गांधी यांची जयंतीही आहे. यादिवशी त्यांचा विचार आत्मसात करून आणि भारतीय संविधानाचा आदर करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा."
सोमवारपासून दीक्षाभूमी ते सेवाग्रामपर्यंत पदयात्रा सुरू होत आहे. त्याचा संदर्भ गौतम बुद्धांच्या पहिल्या क्रांतीशी आहे, असे सांगून काँग्रेसने वैचारिक आणि राजकीय वारसा यांचा पाया रचल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
राज्यातील पूरस्थितीवर भाष्य करताना, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, सरकारकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही." शेतकऱ्यांना तात्काळ मदत न दिल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता.3) राज्यातील प्रत्येक तालुक्यात कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत द्यावी, पुन्हा मशागतीसाठी हेक्टरी 5 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करावे, तसेच रब्बी हंगामाकरिता बियाणे व खते सरकारने मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली.
केंद्राकडून मदतीसाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करीत केंद्राकडून पॅकेज मिळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतच थांबायला हवे होते, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.