

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. माघार घेताना त्यांनी कोणत्याही वरिष्ठ नेत्याला विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर प्रदेश काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. आता याच निलंबनाला अग्रवाल यांनी आव्हान दिले असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकारच नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
अग्रवाल यांच्या माघारीनंतर या मतदारसंघातून भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. त्यामुळे काँग्रेससमोर अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. तत्पूर्वी काँग्रेसच्या अनेक मतदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे उमेदवारी स्वीकारण्यास अनेक इच्छुक पुढे येत नव्हते. अखेर अग्रवाल यांनी उमेदवारी स्वीकारली. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे , माजी आमदार रणजित कांबळे यांच्या उपस्थितीत त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला. तसेच नगरसेवकांच्या बैठका घेऊन निवडणुकीची तयारीही सुरू केली होती.
मात्र, नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अग्रवाल अनपेक्षितपणे माघार घेतली. या निर्णयाबाबत त्यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबनानंतर अग्रवाल यांनी या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसमधील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले. तसेच प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याबाबतही काही आरोप करत त्यासंबंधी पुरावे वरिष्ठ नेतृत्वासमोर सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, अग्रवाल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी निलंबन आदेश मनमानी, राजकीय हेतूने प्रेरित आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे. वस्तुस्थिती मांडण्यासाठी मला कोणतीही पुरेशी संधी देण्यात आली नाही. निष्पक्ष व सखोल चौकशी न करता ही कारवाई करण्यात आली, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
ही शिस्तभंगाची कारवाई पक्षशिस्तीचं कोणत्याही उल्लंघन नाही. त्यामागे विधान परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या गटबाजीचा परिणाम असल्याचाही दावा अग्रवाल यांनी केला आहे. काँग्रेसच्या संविधानानुसार निलंबनासाठी आवश्यक प्रक्रिया पाळण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली नव्हती. त्यामुळे निलंबन आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे अग्रवाल हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक तसेच दीव-दमन, दादरा व नगर हवेली, लक्षद्वीप आणि ओडिशा राज्यांचे प्रभारी आहेत. काँग्रेस संघटनेतील माझे पद प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या समकक्ष असल्याने त्यांना माझे निलंबन करण्याचा अधिकार नाही, असा दावाही अग्रवाल यांनी 'सकाळ' शी बोलताना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.