Long Waiting : अकोला जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड येथे नगर परिषद स्थापनेचा मुहूर्त सरकारला सापडेनासा झाला. नगर परिषद स्थापनेच्या मार्गात गेल्या 23 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अडथळे येत आहेत. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप आता होत आहे.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायत अथवा नगर परिषद व्हावे, यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलनं केली. उपोषणंही झाली. निदर्शनं, रास्ता रोको सुरूच असते. शासनाला रक्ताने पत्र लिहिल्या गेली. इच्छा मृत्यूची परवानगी मागण्यात आली. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात सातत्यानं हा प्रश्न लाऊन धरला तरीही यावर तोडगा निघालेला नाही. (Conversation Of Telhara Tehsil Hiwarkhed Gram Panchayat In Nagar Panchayat Or Nagar Parishan Still Pending Since 23 Years In Akola)
वारंवार होणारी मागणी लक्षात घेता, शासनानं हिवरखेड नगरपंचायतची प्राथमिक घोषणा केली, परंतु त्यावेळी हिवरखेड नगरपंचायत स्थापनेवर स्थगिती आणली गेली. भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी ही स्थगिती आणल्याचा आरोप हिवरखेड येथील ग्रामस्थांचा आहे. तेव्हापासून हा मुद्दा प्रलंबित आहे. नागरिकांचा रोष वाढल्यानं नगरपंचायतऐवजी नगर परिषद (Municipal Council) करण्यात येईल, असं आश्वासन आमदार भारसाकळे यांनी दिलं होतं. त्यासाठी त्यांनी शासनाला पत्रही दिलं.
सरकारवर विश्वास नसल्यानं हिवरखेडच्या नागरिकांनी सामूहिक पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. ग्रामपंचायत ग्रामसभांचे, मासिक सभेचे, जिल्हा परिषद स्थायी समितीचे ठरावही हिवरखेड ग्रामपंचायतीच्या रूपांतरासाठी घेण्यात आले आहेत. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्यमंत्री आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांनी हिवरखेड नगर परिषदेची प्राथमिक घोषणा केली. परंतु त्यानंतर अद्यापही हिवरखेड नगर परिषद अस्तित्वात आलेली नाही. नगर परिषदेला स्थापनेला जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप आता होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ग्रामविकास विभागाने हिवरखेड नगर परिषद निर्मितीमुळं एक जिल्हा परिषद सदस्य सुलभा रमेश दुतोंडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य गोकुळा महेंद्र भोपळे आणि सदफ नाजमीन अब्दुल आदिल यांच्या पदांबाबत सुनावणी घेण्याचे आदेश अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात हे लेखी निर्देश आलेत. परंतु शासनाच्या पत्रावर अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतलेली नाही. ही पदं रिक्त होणार आहेत. मात्र, या सदस्यांनाही सुनावणीबाबत पत्र जिल्हा प्रशासनानं दिलेलं नाही.
शासनाचं पत्र असतानाही सुनावणी प्रलंबित असल्यानं व याबाबत अहवाल शासनाला मिळालाच नसल्यानं हिवरखेड नगर परिषदेची स्थापना होईल कशी, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. या सर्व परिस्थितीमुळं हिवरखेड नगर परिषद निर्मितीच्या मार्गात कोण अडसर आणत आहे, याचा शोध घेणं गरजेचं झालं आहे. ग्रामपंचायतीत मूलभूत सुविधा मिळण्यात मर्यादा असल्यानं लोक नगर परिषद स्थापनेची मागणी करीत आहेत. अशात सातत्यानं विलंब होत असल्यामुळं मोठं आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.