Cricketnama 2023 : काँग्रेसच्या खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर रोखला भाजपचा विजयरथ!

Congress Wins against BJP : नाना पटोलेंची व्यूहरचना आली कामाला अन् सामना काँग्रेसने जिंकला
Congress Wins against BJP
Congress Wins against BJPSarkarnama
Published on
Updated on

Congress Warriors Vs BJP Kings : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यूहरचना करीत मैदानावर उतरविलेल्या प्रत्येक खेळाडूने आपले कौशल्य दाखविल्यामुळं ‘क्रिकेटनामा’च्या मैदानावर त्यांना भाजपची विजयाच्या दिशेने सुरू असेलली वाटचाल रोखता आली आणि सामना जिंकता आला.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे सोमवारी (ता. 11) थाटात उद्घाटन झाले. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या या स्पर्धेचा तिसरा सामना काँग्रेस आणि भाजप यांच्यात झाला.

सकाळचे (मुंबई) संपादक राहुल गडपाले, ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यांच्या उपस्थितीत भाजपने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress Wins against BJP
Cricketnama 2023 : राष्ट्रवादीच्या करेक्ट टायमिंगमुळं 'Team BJP' पराभूत!

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर वजाहत मिर्झा आणि विश्वजीत कदम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. राहुल कुल यांनी पहिलं षटक टाकलं. मैदानावरील आपला ‘पंजा’ घट्ट करीत मिर्झा यांनी सुरुवातीपासून जमके फटकेबाजी केली. त्यांनी पहिल्याच षटकात 5 चेंडूत 11 धावा काढल्या. दुसऱ्या षटकामध्येही मिर्झा पूर्णपणे फार्मात होते. विश्वजित कदम हे मात्र संयमानं खेळत होते. संतोष दानवे यांना हे षटक महागात पडलं. त्यानंतर भाजपचे जयकुमार गोरे यांनी गोलंदाजी केली. त्यांच्या चेंडूंवरही मिर्झा यांनी फटके लगावले.

गोरे यांच्या फुलटॉस चेंडूवर भाजपचे डॉ. परिणय फुके यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू ‘बाँड्री लाइन’च्या पलीकडे गेला. कदम आणि मिर्झा ही जोडी मैदानावर स्थिरावली असतानाच राम सातपुते यांनी चेंडूवर मिर्झा यांना बोल्ड केलं. त्यामुळे 45 धावसंख्या असताना काँग्रेसचा पहिला गडी बाद झाला.

Congress Wins against BJP
Cricketnama 2023 : रोमहर्षक सामन्यात टीम 'एनसीपी'ने भाजपला दिला पराभवाचा धक्का

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे त्यानंतर मैदानावर आले. सातपुते यांच्या ‘फुलटॉस’वर लोंढे यांनी चौकार लगावला. जयकुमार गोरे यांनी चौथ्या षटकात अतुल लोंढे यांना ‘बोल्ड’ केलं. त्यावेळी दोन गडी बाद 54 अशी काँग्रेसची धावसंख्या होती. झिशान सिद्दीकी यांनी येताच आक्रमक भूमिका घेत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी येताच षटकार मारल्याने पाच षटकात 60 धावांचं लक्ष्य भाजपपुढं ठेवलं गेलं. काँग्रेस संघाचे कर्णधार नाना पटोले (Nana Patole), अभिजित वंजारी, विकास ठाकरे, अमित झनक, उमेश डांगे यांना मैदानावर उतरण्याची संधी मिळालीच नाही.

Congress Wins against BJP
Cricketnama 2023 : क्रिकेटच्या 'महासंग्रामा'ला सुरुवात; बोचऱ्या थंडीत नागपुरातील वातावरण तापलं

यानंतर धावसंख्येचं लक्ष्य गाठण्यासाठी भाजपनं सुरुवात केल्यानंतर मैदानावर राहुल कुल आणि जयकुमार गोरे हे उतरले. मारवान कादरी यांनी काँग्रेसच्यावतीने पहिलं षटक टाकलं. दुसऱ्याच चेंडूवर जयकुमार गोरे हे ‘स्टम्प आऊट’ झाल्याचं अपिल काँग्रेसच्या खेळाडूंनी केली. तिसऱ्या पंचांनी ‘रिव्ह्यू’ पाहिल्यानंतर गोरे यांना बाद घोषित केले.

त्यानंतर सचिन शेट्टी हे मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. त्यावेळी एक बाद नऊ अशी भाजपची धावसंख्या होती. मात्र पहिल्याच षटकात पुन्हा सचिन शेट्टी हे त्रिफळाचीत झालेत. त्यामुळं कादरी यांना दोन गडी टिपता आले. राम सातपुते यांनी येताच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे विनित तोडय यांचं दुसरं षटक त्यामानानं कमी धावा देणारं ठरलं.

अमित झनक यांनी गोलंदाजीला सुरुवात करताच दोन चेंडू वाइड दिल्यानं दोन धावा आयत्या भाजपला मिळाल्या. तीन षटकांच्या अखेरीस भाजप दोन गडी बाद 29 धावांवर होते. झिशान सिद्दीकी यांनी चेंडू हातात घेतल्यानंतर ‘तीन डॉट बॉल’ आणि एक ‘वाइड’ टाकला. त्यानंतरच्या चेंडूत राम सातपुते आणि राहुल कुल यांच्यात धाव काढताना संभ्रम निर्माण झाला त्यामुळे राहुल कुल धावबाद झालेत. त्यानंतर मंगेश चव्हाण मैदानावर उतरले. नव्या गड्याच्या मदतीने सातपुते यांनी धावा काढण्याचा प्रयत्न कायम ठेवला. चौथ्या षटकाच्या अखेरीस तीन गडी बाद 38 अशी भाजपची धावसंख्या हाती.

अखेरचं षटक काँग्रेसच्यावतीनं विनित तोडय यांनी टाकलं. त्यावेळी धावबादसाठी काँग्रेसनं अपिल केलं. तिसऱ्या पंचांनी ‘रिव्ह्यू’ घेतल्यानंतर राम सातपुते हे बाद झाले. मंगेश चव्हाण आणि माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्यात त्यानंतर धाव काढण्यावरून पुन्हा संभ्रम झाला पण डॉ. फुके हे बचावले. मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. 45 धावांपर्यंतच भाजप पोहोचू शकलं.

सामनावीराचा पुरस्कार अनिकेत तटकरे, बच्चू कडू यांच्या हस्ते काँग्रेसचे डॉ. वझाहत मिर्झा यांना प्रदान करण्यात आला. ‘सरकारनामा’चे संपादक ज्ञानेश सावंत यावेळी उपस्थित होते. नीलेश नातू यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

फुटबॉलसोबत क्रिकेटचही वेड -

विश्वजित कदम(Vishwajit Kadam) यांचा आवडता खेळ फुटबॉल आहे. परंतु त्यांना क्रिकेटचंही प्रचंड वेड आहे. क्रिकेटप्रेमातून त्यांनी ‘क्रिकेटनामा’च्या मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला व फटकेबाजी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

थंडीतील सामन्यांची मजाच वेगळी -

अनिकेत तटकरे यावेळी बोलताना म्हणाले की, ‘क्रिकेटनामा’चा पहिला सीझन पुण्यात झाला होता. त्यावेळी उन्हाळा होता. हा सामनाही आगळावेगळा होता. यंदा हिवाळ्यात नागपूर येथे सामने होणार असल्यानं त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. थंडीतील या सामन्यांचा अनुभवही मस्त ठरला.

भाऊंचं प्रेशर असते... -

सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर डॉ. वझाहत मिर्झा म्हणाले की, नाना पटोले यांची व्यूहरचना कामाला आली. नानाभाऊंचं आमच्यावर प्रेशर असतं. त्यामुळे आम्हाला परफॉर्म करावंच लागतं, असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com