अशोक काटकर
Yavatmal District APMC Election : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा बाजार समितीची निवडणूक येत्या रविवारी (ता. ३०) होत आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनेल, तर शिवसेना-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनल यांच्यामध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यात सत्तास्थानी असलेल्या येथील भाजपने मात्र, या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. (BJP, however, has withdrawn from this election)
या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे मिळून महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेल उभे करण्यात आले आहे. त्यामध्ये काँग्रेसचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चार उमेदवारांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी राज्यमंत्री संजय देशमुख, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वसंत घुईखेडकर यांच्या मार्गदर्शनात महाविकास आघाडीचे पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलचे १८ उमेदवार शिंदे गट व शिवसेनेच्या विरोधात लढत आहेत.
दुसरीकडे जागा वाटपावरून भाजप व शिंदे गट-शिवसेना यांची महायुती फिसकटली. त्यामुळे भाजपने आपल्या सर्व उमेदवारांची उमेदवारी मागे घेतली आहे. परिणामी शिंदे गट शिवसेनेने सर्वच्या सर्व १८ जागांवर उमेदवार उभे करून ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाप्रणीत शेतकरी विकास पॅनेल महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेल विरुद्ध उभे ठाकले आहे.
येथील बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघातील एकूण ३५ सहकारी संस्था आहेत. त्यामध्ये ४४७ मतदार आहेत. या मतदारसंघातून ११ उमेदवारांच्या निवडीसाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे ११, शिंदे गट शिवसेनेच्या ११ उमेदवारांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये एकूण ५९ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये ४९५ मतदार आहेत. या मतदारसंघातून चार उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे चार, शिवसेना शिंदे गटाचे चार, तर इतर दोन असे १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. व्यापारी अडते मतदारसंघात एकूण ८२ मतदार आहेत. या मतदारसंघातील दोन जागांसाठी महाविकास आघाडीचे दोन, तर शिंदे गटाचे दोन असे चार उमेदवार उभे आहेत. तर हमाल मापारी मतदारसंघात एकूण ८९ मतदार आहेत. या मतदारसंघातील एका जागेसाठी महाविकास आघाडीचा एक तर शिवसेना शिंदे गट एक असे दोन उमेदवार उभे आहेत.
मतदारांच्या भेटीगाठींवरच जोर!
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलमधील उमेदवारांच्या विजयासाठी (Congress) काँग्रेस, (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) बैठका घेतल्या. प्रत्यक्ष मतदाराच्या भेटीगाठी घेत आपला उमेदवार कसा विजयी होईल, याकडे लक्ष आहे, तर दुसरीकडे भाजपची साथ सुटली तरीही शिंदे गटाच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व उमेदवार यांच्या बैठका झाल्या आहेत.
मतदारांच्या भेटीघाटी घेत प्रचारात जोर धरला आहे. या दोन्ही पॅनलच्या जबरदस्त प्रचारामुळे दोघांमध्ये घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल, एवढे मात्र निश्चित.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.