

Amravati News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपरिषदेत बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी यासाठी मोठी खेळी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले आहेत. त्यांनी थेट राणा दम्पत्यांवर दमबाजीचा आरोप केला आहे. सोबत आमिष दाखवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यास रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले. निवडणुकीत माघार घ्यायचा आणि निवडणूक लढण्याचा अधिकार उमेदवाराचा असतो. काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्यापूर्वी पक्षाच्या नेत्यांनी रोखणे आवश्यक होते. मात्र प्रदेशाध्यक्षांचे नेतृत्व कमी पडले त्यामुळे आमचा उमेदवार बिनविरोध निवडून आला असल्याचा दावा आमदार राणा यांनी केला आहे.
चिखलदरा नगर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांचे भाऊ असल्याने संपूर्ण भाजप सक्रिय झाली होती. आपला उमेदवार निवडून यावा यासाठी काळजी घेत होती.
त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नवनीत राणा यांच्यासह खासदार अनिल बोंडे, निवडणूक निरीक्षक आमदार संजय कुटे हे जातीने उपस्थित होते. हे बघता काँग्रेसचे नेतेही ही निवडणूक अंगावर घेतील, आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार ताकद लावतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणुकीपूर्वी नांगी टाकली. त्याच्यासह इतरांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता मुख्यमंत्र्यांच्या भावाचा विजय निश्चित झाला आहे.
यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उमेदवारी मागे घ्यायच्या दिवशी योगायोगाने सपकाळ अमरावतीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी ही माघार भाजपच्या बळामुळे झाल्याचा आरोप केला. यावर रवी राणा (Ravi Rana) म्हणाले अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना सपकाळ त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत हेच माहीत असे सांगून त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
चिखलदऱ्याच्या गरजा काय याची माहिती प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना नाही. त्यांचा उमेदवार लढला असता तरी आम्हाला काही फरक पडला नसता. कलोती हे निवडून आलेच असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर चिखलदऱ्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे. तो आता आणखी वेगाने होत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने आमच्या उमेदवारासोबत चर्चा करून निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
चिखलदरामध्ये काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढण्यास कोणीच तयार नव्हते. या भागाच्या निवडणूक प्रमुख माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीसुद्धा पुढाकार घेतला नाही. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपात सहभागी होत आहे. त्यांच्यावर कोणी दबाव टाकलेला नाही. ते पक्ष का सोडून जात आहे यावर सपकाळ आणि ठाकूर यांनी आत्मचिंतन करावे असा सल्लाही आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.