

चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांच्या विरोधात प्रभागात रिंगणात असलेल्यांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यासोबतच भाजपने अमरावती जिल्ह्यात आपले खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात 3 उमेदवारांनी अर्ज भरला होता. परंतु आज विरोधातील सर्वांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत.
या निवडीनंतर चिखलदरा नगरपालिकेत भाजपचे खाते उघडले आहे. चिखलदरा ही ‘क’ दर्जाचे नगरपालिका असून याठिकाणी 10 प्रभाग आहेत. 20 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात सर्वांत लहान नगरपालिका म्हणून या नगरपालिकेची ओळख आहे. आल्हाद कलोती यांच्या विरोधातील सर्व अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडल्या गेले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन मोरणकर यांनी दिली.
प्रभाग क्रमांक दहामध्ये 200 मतदार असून आमदार रवी राणा यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले आहेत. रवी राणा यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह सोमवंशी यांच्याशी समन्वय साधून भाजपसाठी एक जागा बिनविरोध निवडून आणली. आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून आमदार रवी राणा यांचं अभिनंदन केलं.
चिखलदरा नगरपालिकेतील निवडणूक यंदा विशेष चर्चेत होती, कारण आल्हाद कलोती पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने त्यांचा विजय सहज झाल्याचे दिसून आले. त्यामुळे चिखलदरा नगरपालिकेतील निवडणूकप्रक्रिया आणि त्यातील राजकीय हालचालींबाबत स्थानिकांमध्ये चर्चेला अधिक उधाण आले आहे.
राज्यात याआधीही अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणुका पार पडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपचे सर्व 17 उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेत. त्याचप्रमाणे दोंडाई नगर परिषदेतही मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्ष म्हणून आणि सात नगरसेवकही विरोधाशिवाय विजयी झाले.