Devendra Fadnavis is trying to kill two birds with one stone : भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २०) अचानक कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्या सोबत होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. डॉ. देशमुख यांना सावनेरमधून सुनील केदार यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर लढवण्याचा फडणवीसांचा विचार असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Deshmukh had reduced the majority of Fadnavis by fighting bitterly)
या चर्चेत दम असल्यास फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला, असे म्हणता येईल. कारण २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत डॉ. आशिष देशमुख फडणवीसांच्या विरोधात कॉंग्रेसच्या तिकिटावर लढले होते. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते आणि एक ते सव्वा लाखाच्या मताधिक्याने ते निवडून येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.
त्या परिस्थितीत आशिष देशमुख यांना कॉंग्रेसने ऐन वेळेवर दक्षिण-पश्चिममधून उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांना प्रचारासाठी केवळ ११ दिवस मिळाले होते आणि त्याही परिस्थितीत देशमुखांनी कडवी झुंज देत फडणवीसांचे मताधिक्य ५० हजार ते ७५ हजारांनी कमी केले, अशी तुफान चर्चा रंगली होती.
कर्नाटकच्या निकालानंतर भाजप एक-एक पाऊल फुंकून-फुंकून टाकत आहे. कारण भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. आपले आमदार वाढवण्यासाठी विरोधकांचे आमदार कमी करणे, हे सूत्र वापरून भाजपचे काम सुरू आहे. सावनेरमध्ये कॉंग्रेसचे हेवीवेट नेते सुनील केदार आमदार आहेत. तेथे त्यांना पराभूत करू शकणारा उमेदवार भाजपकडे आज तरी दिसत नाही. पण आशिष देशमुख तेथेही जाऊन तगडी टक्कर देऊ शकतात, याची कल्पना फडणवीसांना आहे.
२०१४च्या निवडणुकीत डॉ. आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बलाढ्य नेते आणि त्यांचे काका अनिल देशमुख यांना पराभवाची चव चाखायला लावली होती. तेव्हा ते भाजपच्या तिकिटावर लढले होते. नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपशी फारकत घेतली, हा भाग वेगळा. सावनेरमध्ये सुनील केदारांच्या पूर्वी आशिष देशमुख यांचे वडील रणजीत देशमुख आमदार होते. त्यानंतर आशिष देशमुखही तेथे एकदा लढलेले आहेत. हा इतिहास बघता यावेळी आशिष देशमुख सावनेरमधून लढले, तर ते केदारांना चांगली टक्कर देऊ शकतात.
डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) २०२४मध्ये पुन्हा दक्षिण-पश्चिममधून लढल्यास फडणवीसांसाठी ते अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये (BJP) घेऊन सावनेरच्या लढाईवर पाठवण्याचे फडणवीसांचे नियोजन असावे, अशी चर्चा आजच्या भेटीनंतर सुरू झाली आहे. कारण काल सावनेरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी तसे सूचक वक्तव्य केले होते. हे खरे ठरल्यास इकडे नागपूर (Nagpur) दक्षिण-पश्चिममध्ये फडणवीसांचा (Devendra Fadanvis) मार्ग सुकर होणार आहे आणि तिकडे सावनेरमध्ये लढण्यासाठी भाजपला चांगला योद्धा मिळणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.