Lok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीची तारीखा जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशात सर्व राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. राज्यात विरोधी पक्षात असलेली महाविकास आघाडी भाजपला पराभूत करण्याचा दावा करत असली तरी महायुतीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. विदर्भातील चार जागांसह राज्यातील नऊ जागांवर महाविकास आघाडीमध्ये अद्यापही एकमत झालेले नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना या जागांवर उमेदवार हवा आहे. त्यामुळे एकमत होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
विदर्भातील अकोला, रामटेक, गोंदिया भंडारा आणि वर्धा या चार लोकसभा मतदारसंघातील जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासह वंचित बहुजन आघाडीला विदर्भातील चारही जागांवर एकमत करता आलेले नाही. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीचे उमेदवार केव्हा जाहीर होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कदाचित महायुती आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोला लोकसभा मतदारसंघ गेल्या चार निवडणुकीपासून भाजपकडे आहे. येथून सलग निवडणूक जिंकत संजय धोत्रे लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. सध्या काँग्रेस महायुतीकडे या जागेची मागणी करत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा हा बालेकिल्ला आहे. आंबेडकर या मतदारसंघातून खासदार झाले होते. आता हा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. परंतु अकोल्यावर ‘वंचित’ने दावा केल्याने अकोल्याबाबत शिक्कामोर्तब झालेले नाही. अकोल्याचा तिढा अद्यापही कायम आहे.
गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल अनेकवेळा येथून खासदार झाले आहेत. ही जागा 2014 पासून भाजपकडे आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे. एकीकडे शरद पवार गट येथून दावा सांगत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसलाही भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना येथून उमेदवारी देण्याची पक्षाची इच्छा आहे. नाना पटोले 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर येथून खासदार झाले होते. मात्र अद्याप या मतदार संघाबाबत काहीही ठरलेले नाही.
रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात मोठी चूरस पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेस नेते 2014 मधील भूतकाळाचा हवाला देत येथून आपला उमेदवार उभा करणार असल्याची ठाम चर्चा करीत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटही येथून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. रामटेक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2014 आणि 2019 मधील निवडणुकीत शिवसेनेचे कृपाल तुमाने येथून खासदार झालेत. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झालेत. त्यामुळे तुमाने यांना धडा शिकविण्यासाठी ठाकरे गटाला रामटेकचा मतदारसंघ हवा आहे.
महाविकास आघाडीत वर्धा लोकसभा जागा काँग्रेसच्या खात्यात राहिली आहे. 2014 पूर्वी दत्ता मेघे येथून काँग्रेसचे खासदार होते. मात्र, मोदी लाटेत त्यांना जागा गमवावी लागली. गेल्या दोन निवडणुकीपासून भाजपचे रामदास तडस येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, यंदा गणित बदलले आहे. एकीकडे काँग्रेस स्वत:च्या जागेचा दावा करीत आहे. काँग्रसने उमेदवार देण्याची तयारी चालविली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील ताकदीचा मुद्दा पुढे करीत राष्ट्रवादी काँग्रेसही येथे कामाला लागली आहे. माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांना पवारांनी कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे विदर्भातील चार जागांवर एकमत झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.