Akola Political News : भारतीय जनता पार्टीत कोंडी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आमदार एकनाथ खडसे यांची नाराजी अद्यापही दूर झालेली दिसत नाही. भाजपमध्ये मिळालेल्या वागणुकीबद्दल ते संतप्तच आहे. आपल्या अकोला भेटीदरम्यानही नाथाभाऊंनी आपली नाराजी बोलून दाखविली. विशेष करून त्यांचा रोष भाजपमधील एका नेत्यावर होता. (My big role in making Devendra Fadnavis a in politics)
अकोल्यात आल्यानंतर आमदार एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठे विधान केले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना राजकारणात घडविण्यात आपला मोठा वाटा होता. फडणवीस भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष झाले. त्यावेळीही आपणच पुढाकार घेतला. आपण त्यांना सतत पाठबळ दिले. त्यामुळे कालांतराने ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही आलेत. पण फडणवीस यांनी रंग दाखवत नंतर कुरघोडी केली, असा थेट आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला.
राजकारण आणि राजकीय स्पर्धा आपल्या जागी आहे. त्याला एक मर्यादा असते. परंतु फडणवीस यांची वृत्ती सुडाची आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने फडणवीसांची ही वृत्ती अत्यंत अशोभनीय आहे, अशी टीकाही त्यांनी केली. देवेंद्र यांची राजकारणात सुरुवात असताना आपण त्यांना अनेकदा संधी दिली.
राजकारणातील अनेक गोष्टी शिकवल्या. २०१४मध्ये विरोधी पक्षनेता असताना त्यांना आपल्या जवळची जागा दिली. प्रसंगी आपण गप्प राहायचो पण फडणवीसांना बोलण्याची संधी द्यायचो. फडणवीसांना विधिमंडळात महाराष्ट्राचे अनेक प्रश्न मांडण्याची संधी त्यातून मिळाली. अर्थात त्यांचेही त्यात कौशल्य होते. परंतु फडणवीस यांनी नंतर जे केले ते अयोग्यच होते, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.
फडणवीसांच्या राजकीय जडणघडीत आपला मोलाचा वाटा होता. वाटेल ती मदत, सहकार्य त्यांना केले. परंतु नंतर त्यांनीच आपल्यावर कुरघोडी केली. ही केवळ राजकीय स्पर्धा नव्हती. केवळ कुरघोडी करण्यापुरता हा प्रकार नव्हता, तर फडणवीसांनी आपला व्यक्तीगत छळ केला, असा थेट आरोप खडसे यांनी केला.
फडणवीसांकडुन मनोबल खच्चीकरणाचे काम सुरूच आहे. त्यातून विनोद तावडे सावरले आहेत. सध्या ते राष्ट्रीय राजकारणात रूळले आहेत. पंकजा मुंडे या सध्या संभ्रमात आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्या कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीये. पंकजा परिपक्व नेत्या आहेत. लवकरच त्या देखील योग्य तो निर्णय घेतील. आपल्याला जो निर्णय घ्यायचा होता, तो आपण घेतला आहे. विरोधी पक्षातील नेता म्हणून आपण भूमिका बजावत आहोत, असे एकनाथ खडसे यांनी नमूद केले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.