Co-operative Sector Politics : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या 24 जानेवारी रोजी होऊ घातली आहे. या पदासाठी भाजप गटातील पारस पिंपळकर व सुनील फरकडे यांच्यात कमालीची लढत होत असल्याचे चित्र आहे. उपसभापतिपदासाठी दोघांनीही जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे 24 जानेवारीला स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच याची रंगतदार चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी पार पडलेली निवडणूक संपूर्ण राज्यभर गाजली होती. या निवडणुकीत काँग्रेस व भाजप हे दोनही प्रमुख विरोधी पक्ष सत्तेसाठी एकत्र आले होते. काँग्रेसच्या एका गटाला दूर ठेवण्यासाठी दस्तूरखुद्द काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवताळे व भाजपचे देवराव भोंगळे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सत्ता आणली.
काँग्रेसचे गंगाधर वैद्य यांची सभापतिपदी वर्णी लागली, तर उपसभापतिपदी भाजपचे गोविंदा पोडे यांची निवड करण्यात आली होती. या निवडणुकीनंतर भाजप व काँग्रेसनेत्यांनी एकमेकांचे हातात हात घेऊन केलेला ‘डान्स’ चांगलाच चर्चेत आला होता. या ‘डान्स’नंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवताळे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता स्थापना झाल्यानंतर नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी नदीपात्रात उतरलेल्या उपसभापती गोविंदा पोडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर उपसभापतिपदाची निवडणूक आता 24 जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. या पदासाठी आता सत्ताधारी गटातील दोघे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ग्रामपंचायत गटातून सर्वाधिक मताने निवडून आलेले धानोरा येथील पारस पिंपळकर यांचे नाव आघाडीवर आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पिंपळकर यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराचा मोठा अभ्यास आहे. ते स्वतः ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिले आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. दुसरीकडे कोठारी येथील सुनील फरकडे यांचीदेखील उपसभापतिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. फरकडे यांना बाजार समितीच्या कारभाराचा बराच मोठा अनुभव आहे. ते दुसऱ्यांदा बाजार समितीचे संचालक झाले आहेत. अनिल मोरे यांचेही नाव पदासाठी घेतले जात आहे.
चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार बराच व्यापक आहे. बाजार समितीत एकूण 18 संचालक आहेत. त्यापैकी काँग्रेस व भाजप या सत्ताधारी गटाकडे 11 संचालक आहेत. काँग्रेसच्या दिनेश चोखारे यांच्या गटाकडे 6 संचालक आहेत. बहुमत असल्याने सत्ताधारी गटाकडेच उपसभापतिपद राहणार असल्याचे बोलले जात आहे. उपसभापतिपदावर कोण बाजी मारते, यासाठी आता 24 जानेवारीला होत असलेल्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.