एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला असेल तर हात कलम करेल : बच्चू कडू

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, देशभरात न्यायालयांमध्ये काय सुरू आहे, ते देशाची जनता बघत आहे. अकोला न्यायालयातही हाच प्रकार सुरू असल्याचे या निर्णयावरून बघायला मिळते.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

नागपूर : न्यायालयाच्या आदेशाने राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी ‘सरकारनामा’सोबत बोलताना दिली. एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला असेल तर हात कलम करेल, असेही ते म्हणाले.

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, देशभरात न्यायालयांमध्ये काय सुरू आहे, ते देशाची जनता बघत आहे. अकोला (Akola) न्यायालयातही (Court) हाच प्रकार सुरू असल्याचे या निर्णयावरून बघायला मिळते. जेथे रस्ताच नाही, तेथे बांधकाम करून पैसा खाल्ल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीने (Vanchi Bahujan Aaghadi) केला आहे. ‘अरे बावा, रस्ताच नाही त मंग काय हवेत केले का बांधकाम? ते तरी न्यायालयाने नाही त वंचितने सांगाव’, असे त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितले.

जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार, खासदार यांच्याकडून रस्ते आणि इतर कामांसाठी मागण्या येत असतात. ज्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे, ते काम भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी सुचविलेले आहे आणि पालकमंत्री म्हणून कामांना मंजुरी देण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार काम केले. हे करतानाही हा भाजपचा, तर तो दुसऱ्याचा असा दुजाभाव केला नाही. पण यामध्ये वंचितने भ्रष्टाचाराचा आरोप करणे अनाकलनीय आहे. न्यायालयानेही या प्रकरणाची योग्य चौकशी न करता निर्णय दिला, असे आता वाटत आहे.

जेव्हा काम सुचवण्यात आले होते, तेव्हा त्या रस्त्यावर अनेक शेतकरी, शेतमजूर अवलंबून आहेत, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे प्राधान्याने ते काम करण्यात आले. त्याचा गाव क्रमांक, रस्ता क्रमांकही असतो. पण पालकमंत्री एवढ्या बारीक सारीक गोष्टी बघत नाही. मी काय कुठलाही पालकमंत्री एवढ्या खोलात जात नाही. आता जर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचितने केला, तर त्यांनी तसे पुरावे दिले का आणि न्यायालयाने त्याची योग्य चौकशी केली का, असे प्रश्‍न उभे राहात आहेत. अशा प्रकारचे निर्णय दिले जात असतील, तर आम जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा विश्‍वास उडाल्याशिवाय राहणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu
Video : मी वरच्या कोर्टात अपील करणार - बच्चू कडू

योग्य चौकशी न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सदर न्यायाधीशही वंचित धार्जिणे असावे, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. वंचितने जेव्हा हा आरोप केला होता, तेव्हा मी स्वतः रस्त्याच्या कामावर गेलो होतो आणि पाहणी केली होती. त्यामुळे ‘रस्ताच नाही तेथे काम करून अपहार केला’, हा वंचितचा आरोप निराधार आहे. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा चौकशी करून या प्रकरणी न्याय द्यावा, अशी विनंती आहे, असेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी म्हण्टले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com