फडणवीस म्हणाले; भाजप संयमी पक्ष, संजय राऊतांनाच अजीर्ण होऊ नये…

चार राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. या विजयाचे अजीर्ण भाजपला होऊ नये, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. त्याचा फडणवीसांनी (Devendra Fadanvis) चांगलाच समाचार घेतला.
Devendra Fadanvis and Sanjay Raut
Devendra Fadanvis and Sanjay RautSarkarnama

नागपूर : भारतीय जनता पक्ष हा संयमी पक्ष आहे. आज मिळालेल्या विजयाने आम्हाला अजीर्ण होणार नाही. पण संजय राऊतांना अजीर्ण होऊ नये, याची काळजी त्यांनी घ्यावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजपने मुसंडी मारली आहे. या विजयाचे अजीर्ण भाजपला (BJP) होऊ नये, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. त्याचा फडणवीसांनी (Devendra Fadanvis) चांगलाच समाचार घेतला. गोव्यात सत्ता स्थापनेविषयी बोलताना ते म्हणाले, विश्‍वजित राणे यांनी या निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ते चांगले नेते आहेत. भाजपच्या या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहे, अशा वावड्या आता उठवल्या जात आहेत. त्याला काही अर्थ नाही. कारण अशा परिस्थितीत, हे होतच असते. हा निर्णय आमच्या पार्लीमेंट्री बोर्डाच्या बैठकीत होणार आहे.

गोव्याची निवडणूक आम्ही प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वात लढवली. विश्‍वजित राणे यांना मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा आहे. राजकारणात प्रगती व्हावी, असे वाटणे गैर नाही. पण मुख्यमंत्री कोण, याबाबत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, ही भाजपची संस्कृती आहे. भाजप कायम जनतेच्या सोबत आहे, सेवेत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा पक्ष अधिक मोठा होत चालला आहे. याउलट कॉंग्रेस नेतृत्वहिन झाली आहे. लोकांचा कॉंग्रेसवर विश्‍वास राहिलेला नाही. जनताच काय पण त्यांच्याच कार्यकर्त्यांचा विश्‍वास त्यांच्यावर राहिलेला नाही. त्यामुळे आता कॉंग्रेसला फार भविष्य नाही, असे फडणवीस म्हणाले.

गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष सोबत लढले, तर कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढली. यापेक्षा महाविकास आघाडी एकत्र आमच्या विरोधात लढली असती, तर आम्हाला यापेक्षाही जास्त जागा मिळाल्या असत्या. मी पहिल्या दिवशीच सांगितले होते की, शिवसेनेसोबत आमची लढाई नव्हतीच. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची लढाई नोटासोबत होती. दोन्ही पक्षांना मिळालेली मते नोटापेक्षाही कमी आहेत. त्यामुळे नोटासोबतची लढाईसुद्धा हे दोन पक्ष हरलेले आहेत. राष्ट्रवादीला तरी बऱ्यापैकी मतं मिळाली, पण शिवसेनेला तुलनेत कमी मते मिळाली आहेत.

Devendra Fadanvis and Sanjay Raut
फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिका गेली तरी चालेल; पण...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पराभूत करणार, असे शिवसेना नेते बोलले होते. पण त्यांच्या उमेदवाराला तेथे केवळ ९७ मते मिळाली. शिवसेना हा ठाकरे परिवाराचा पक्ष आहे. आदित्य ठाकरेंना भविष्यात तो सांभाळावा लागू शकतो. त्यामुळे सेनेने त्यांना गोव्यात पाठवले असावे, त्यात काही गैर नाही. पण त्यांच्यात ती परिपक्वता अद्याप नाही, याचेही भान सेना नेत्यांना असायला हवे होते. अशा प्रकारचा विजय मिळाल्यानंतर मनोबल वाढते ते आमचे वाढले आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

या स्थितीत महाराष्ट्रात भाजप पूर्ण तयारीत आहे. २०२४ मध्ये बहुमताने आम्ही सरकार आणणार आहो. दरम्यानच्या काळात सरकार पडलं तर पर्यायसुद्धा देऊ. ज्या प्रकारे महाविकास आघाडी तयार झाली. अशी मंडळी एकत्र आल्यावर काय होईल, हे सांगता येत नाही. अशी सरकारे पाच वर्ष कधी पूर्ण करीत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नाहीये, कधी केलेही नाहीत आणि करणारही नाही. पण जर का तशी स्थिती उद्भवली, तर आम्ही सज्ज आहोत. तशाही परिस्थितीत महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणू, असेही फडणवीस म्हणाले. गोव्यात आमचं डबल इंजीनचे सरकार स्थापन होईल, ते गोव्यातील लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल, असेही ते म्हणाले.

शिवसेनेने लोकसभेत २ जागा जिंकून दाखवाव्या..

आज मिळालेला विजय हा खूप मोठा विजय आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे, संघटनेला आणि मतदारांना जाते. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची आम्हाला घाई नाही. मध्येच निवडणुका झाल्या तरी, आम्ही निवडून येऊ. विरोधकांना सांगणं आहे की, त्यांनी एकत्रित होऊन जावे. ‘ये तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीष महाजन यांनी दिली. पुढील काळात शिवसेनेला त्यांची जागा दिसेल. लोकसभेत त्यांनी २ जागा निवडून आणून दाखवाव्या, असे आव्हानही महाजन यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com