Ravikant Tupkar : रविकांत तुपकर ठरले 'बाजीगर!'; बुलढाण्यात नेमकं काय झालं ?

Prataprao Jadhav Vs Narendra Khedekar : समोर दोन तगडे उमेदवार, त्यातील जाधवांना सत्ताधाऱ्यांची साथ, दुसरे खेडेकरांसोबत आघाडीतील नेत्यांनी रसद पुरवली. यातूनही कुठल्याही बड्या यंत्रणेशिवाय निवडणुकीला सामोरे गेलेल्या तुपकरांनी तब्बल अडीच लाख मते घेतली.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

Buldhana Lok Sabha 2024 Political News : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. यात जाधवांनी चौथ्यांदा खासदारकी पटकावली.

त्यांनी खेडेकरांचा 29 हजार मतांनी पराभव केला. या दिग्गज नेत्यांच्या लढतीत, मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल अडीच लाख मते घेतली. त्यामुळे तुपकर 'बाजीगर' ठरल्याचीच चर्चा मतदारसंघात आहे.

शिवसेना फुटल्यानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने होते. त्यामुळे शिंदेंचे प्रतापराव जाधव आणि ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष होते.

मात्र याच मतदारसंघातून राज्यातील शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी पंगा घेतलेले रविकांत तुपकर अपक्ष लढले. शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेल्या तुपकरांमुळे ही लढत थेट होण्याऐवजी तिरंगी झाली.

या लढतीत प्रतापराव जाधवांनी 3 लाख 49 हजार 867 मते घेत खासदारकीचा चौकार मारला. तर खेडेकरांचा 29 हजार 479 मतांनी पराभव झाला. तर तिसऱ्या क्रमांकावरील रविकांत तुपकरांनी 2 लाख 49 हजार 963 मते घेतली.

समोर दोन तगडे उमेदवार, त्यातील जाधवांना सत्ताधाऱ्यांची साथ, दुसरे खेडेकरांसोबत आघाडीतील नेत्यांनी रसद पुरवली. यातूनही कुठल्याही बड्या यंत्रणेशिवाय निवडणुकीला सामोरे गेलेल्या तुपकरांनी तब्बल अडीच लाख मते घेतली. त्यामुळे विजयी उमेदवारापेक्षा सध्या तुपकरांच्याच पराभवाची चर्चा बुलढाण्यात सुरू आहे.

रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीशी जुळलेले आहेत. त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती.

मात्र, ठाकरेंनी उमेदवार घोषित केल्यानंतर तुपकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या एन्ट्रीने बुलढाण्यातील लढतीत रंगत आली. यात तुपकरांनी शेवटपर्यंत एकाकी संघर्ष केला, मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या कडव्या झुंजीमुळे रविकांत तुपकर 'बाजीगर' ठरल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ravikant Tupkar
Sanjay Kute : संजय कुटे ठरले 'किंगमेकर'; प्रतापराव जाधवांच्या विजयासाठी अशी राबवली रणनीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com