Gadchiroli District Road News : अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मतदारसंघाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या मतदारसंघात स्वतः रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे हे आमदार आपल्या मतदारसंघाच्या समस्यांबाबत किती जागरूक आहेत, हे लक्षात आले. (Collected subscriptions and did road repair work through labor donations)
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील धानोरा तालुक्यातील हिरंगे गावातील नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधिकडे रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात निवेदने दिली, वारंवार पाठपुरावा केला. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे हिरंगे गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन रस्त्याची दुरुस्ती केली.
गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा मुख्यालय पासून ६० किलोमीटर अंतरावर धानोरा तालुक्यातील हिरंगे या गावात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुद्धा रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. पावसाळ्याच्या दिवसात पायवाटेने चिखल तुडवत नागरिकांना प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधी काम करत नसतील तेथे, लोकांना स्वतः कुदळ, पावडे हातात घेऊन काम करावे लागते, हे गडचिरोली जिल्ह्यातील चित्र आहे.
जेथे मूलभूत सोयी सुविधाच उपलब्ध नाहीत, त्या हिरंगेसारख्या गावांतील लोकांनी आनंद उत्सव साजरे करावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतु याकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभा बोलावून प्रत्येक घरातून वर्गणी गोळा केली आणि श्रमदानातून रस्ता दुरुस्तीचे काम केले.
आजारी रुग्णाला किंवा गरोदर मातेला घेऊन जाण्यासाठी बैलगाडी किंवा दुचाकीच्या साह्याने तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे गावकरी स्वतः कामाला लागले आणि दुरुस्ती करूनही टाकली. पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मुख्य म्हणजे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी हे गडचिरोली जिल्ह्याचा भरपूर विकास झाला, असे म्हणतात तर हाच तो विकास का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दोन विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात भाजपचेच (BJP) लोकप्रतिनिधी आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून विकास कामे करून विकासाची गंगा वाहत आहे, असे म्हणत भाजपचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार (MLA) डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्याचा विकास झालेला आहे आता निधी थांबवा, असे सभागृहात सांगितले होते. खरंच विकास झाला असेल तर त्याचे सोशल ऑडिट करायला काय हरकत आहे, असाही ग्रामस्थांचा सवाल आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.