दरबारी राजकारणाला ‘गॉडफादर’ कंटाळले, कॉंग्रेसला धोबीपछाड देणार ?

भाजपने वाशीम (Washim) -यवतमाळ लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये अनंतराव देशमुख हे नाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सर्वात जास्त वलयांकित आहे.
Anantrao Deshmukh, Washim
Anantrao Deshmukh, WashimSarkarnama

वाशीम : जिल्ह्यामध्ये कॉग्रेसचे गॉडफादर म्हणून ओळख असलेले व प्रचंड जनसंग्रह असलेले नेते माजी खासदार अनंतराव देशमुख महिन्याभरात भाजपवासी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तब्बल चार दशकं काँग्रेसच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेले अनंतराव देशमुख भाजपवासी झाले तर काँग्रेसला मोठी राजकीय हानी सहन करावी लागणार असल्याची चर्चा वर्तुळात आहे.

भाजपने वाशीम (Washim) - यवतमाळ (Yavatmal) लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये अनंतराव देशमुख हे नाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सर्वात जास्त वलयांकित आहे. अनंतराव देशमुख यांनी एक वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघाचे तर दोन वेळा वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये (Congress) सर्वाधिक लोकसंग्रह असलेले नेते म्हणून अनंतराव देशमुख यांची ओळख होती. मात्र मागील विधानसभा निवडणुकीपासून ते काँग्रेसच्या बाहेर आहेत. काँग्रेसमधील त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या खात्यात जमा करण्याचे श्रेय त्यांच्या नावे जमा आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात अनंतराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग गेल्या दीड वर्षांपासून अनंतरावांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा व विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसची घसरण होत असताना पक्ष अनंतराव देशमुखांना सन्मान देईल, अशी अटकळ होती. मात्र आपल्याच मनोराज्यात गुंग असणाऱ्या काँग्रेसने दरबारी राजकारणाचा प्रत्यय देत गेल्या दीड वर्षापासून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. ही बाब सतत निवडणुकीत विजयाची गणिते जुळवणाऱ्या भाजपने बरोबर हेरली. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने अनंतरावांच्या भाजप प्रवेशासाठी देव पाण्यात घातले होते. मात्र त्यावेळी जे राजकारण जमले नाही ते आता करून दाखविण्याचा चंग आता भाजपने बांधला आहे.

भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनंतराव देशमुखांच्या भाजप प्रवेशासाठी पक्षांतर्गत फिल्डिंग लागल्याची माहिती आहे. अनंतराव जर भाजपवासी झाले तर भाजपला रिसोड विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा विजयाचा अश्व थांबविता येणार आहे. तसेच वाशीम व अकोला लोकसभा मतदारसंघाच्या विजयामध्ये अनंतरावांचे योगदान लक्षणीय राहणार असल्याने भाजपने जे जाळे फेकले, यासंदर्भात भाजपच्या मुंबई येथील कार्यालयात दोन वेळा चर्चा झाल्याची माहिती असून या महिन्यात अनंतराव भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अनंतरावांचा भाजप प्रवेश झाला आणि सध्या काँग्रेसमध्येच असलेले जिल्ह्यातील अनेक नेते अनंतरावांच्या मागे गेले तर काँग्रेसला भाजपने दिलेली ही मोठी धोबीपछाड ठरणार आहे.

Anantrao Deshmukh, Washim
वाशीम जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलनाची परीक्षा, राजकारण वेगळ्या वळणावर?

काँग्रेसच्या हाती भोपळा..

अनंतरावांना काँग्रेसमधून वजा करून काँग्रेसने काय कमावले व काय गमावले, याचा लेखाजोखा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून समोर आला आहे. जिल्ह्याच्या स्थापनेपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रथम क्रमांकावर असलेली काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. काँग्रेसमध्ये आजही अनंतरावांचे नेतृत्व मान्य करणारा मोठा वर्ग आहे. जर अनंतरावांनी वेगळा मार्ग अवलंबिला तर जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व पणाला लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने संधी गमावली..

अनंतरावांच्या भाजप प्रवेशाची पार्श्वभूमी तयार होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही अनंतरावांना संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र चर्चेच्या फेऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस मागे पडली. सत्ताकारणात मग्न राहिल्याने भाजपने राष्ट्रवादीवर मात करीत अनंतरावांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर केला आहे. भाजपच्या गोटातून झालेल्या सर्व्हेक्षणात अनंतराव देशमुखांची उपयोगिता जिल्ह्यात सर्वच नेत्यांपुढे वरचढ ठरल्याने भाजपने ही खेळी केल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com