Gondia Bridge Controversy : प्रशासकीय आणि राजकीय अनास्था काय असते, याची प्रचिती गोंदिया जिल्ह्यात नुकतीच आली. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी या गावांना जोडणाऱ्या वाघ नदीवरील पुलाच्या बाबतीत लोकांना असाच अनुभव येत आहे. दोन वर्षे झाली दोन वेगवेगळ्या आमदारांनी दोन वेळा भूमिपूजन केले. तरी बांधकामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही.
या प्रकाराला संतापून भजेपार व बोदलबोडी येथील नागरिकांनी थेट नदीत उतरून नुकतेच अर्ध जलसमाधी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आणि त्यानंतर कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र राजकीय, प्रशासकीय अनास्था गावकऱ्यांच्या जिवावर कशी उठली आहे, याची प्रचिती मिळाली आहे.
येत्या शनिवारपासून (ता. 24) कामाला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील भजेपार- बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठा पूल मंजूर आहे. अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी पूर्णत्वास जाऊन पूल मंजूर झाला. दरम्यान, या पुलाच्या बांधकामाचे दोनदा भूमिपूजन झाले. एकदा भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांनी, तर दुसऱ्यांदा काँग्रेसचे विद्यमान आमदार सेसराम कोरोटे यांच्या हस्तेसुद्धा भूमिपूजन झाले आहे. त्यानंतर जसजसे बांधकामाला सुरुवात झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खड्डे खोदून पुलासाठी खोदकाम करत असताना दगड लागल्याचे कारण देत दोन वर्षांपूर्वी खोदकाम अर्धवट ठेवून काम बंद पाडण्यात आले. यासाठी भजेपार-बोदलबोडी रस्ता बंद पडला. परिणामी नागरिकांना 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 15 किलोमीटर फेऱ्याने पायपीट करावी लागत आहे. या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश खदखदत होता. त्यामुळे पुलाचे रखडलेले अर्धवट बांधकाम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी करण्यात आली.
यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी नागरिकांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर विभागाने पुढाकार घेऊन पूल बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिलेला अवधी लोटूनही विभागाला जाग आली नाही.
शेवटी संतापलेल्या गावकऱ्यांनी अर्ध जलसमाधी आंदोलन केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन, प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला. आंदोलनात परिसरातील गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
अर्ध जलसमाधी आंदोलनाची तीव्रता आणि नागरिकांचा असंतोष पाहता सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली. दरम्यान अभियंता उसेंडी, उपअभियंता मानकर यांनी गावकऱ्यांना भेट दिली. रखडलेल्या पुलाचे बांधकाम 24 फेब्रुवारीपूर्वी सुरू होईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे अर्ध जलसमाधी आंदोलनाचा धसका प्रशासनाने चांगला घेतल्याचे दिसून येते.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.